मुंबई: शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी 'नाईट लाईफ' योजनेला अखेर राज्य मंत्रिमंडळाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यामुळे २६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनिवासी भागातील मॉल्स, हॉटेल आणि दुकाने रात्रीच्यावेळी सुरु ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारपरिषद घेऊन याबद्दल माहिती दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मुंबईत रात्रीच्यावेळी अनेक पर्यटक येतात. अशावेळी त्यांना खाण्यापासून अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच शहरात रात्रीच्यावेळी काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय आवश्यक होता.
महाराष्ट्रातील वातावरण भयमुक्त; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
मॉल किंवा मिल कपाउंड अशा ठिकाणी कुणीही राहत नाही. केवळ तेथील दुकाने, हॉटेल्स आणि थिएटर २४ तास सुरु राहतील. त्यामुळे निवासी भागातील लोकांना याचा त्रास होणार नाही. तसेच रात्रीच्यावेळी पोलिसांनाही दुकाने बंद झाली आहेत किंवा नाहीत, यासाठी गस्त घालण्याचा त्रास होणार नाही. यामुळे पोलिसांवरील ताण उलट कमीच होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे रोजगार आणि महसूल वाढेल, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मात्र, भाजपने सुरुवातीपासूनच नाईट लाईफला विरोध केला आहे. नाईट लाईफमुळे मुंबईत दारू पिण्याची संस्कृती फोफावेल. त्यामुळे निर्भया प्रकरणासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल. ही संस्कृती आपल्या देशासाठी योग्य आहे का, याचा विचार सरकारने करावा, असे भाजप नेते राज पुरोहित यांनी म्हटले होते.