तनुश्री आणि नाना : आतापर्यंत बॉलिवूडमधील वादळांचे काय?

अमराठी कलाकार जमातीचा दांभिकपणाही समोर आलाय. नाना पाटेकर यांच्याविरोधात बॉलिवूडमधील अमराठी टक्का एकवटताना दिसत आहे.

Updated: Sep 29, 2018, 07:56 PM IST
तनुश्री आणि नाना : आतापर्यंत बॉलिवूडमधील वादळांचे काय? title=

मुंबई : अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्यातला वाद आता चांगलाच पेटलाय. नानांच्या विरोधात तनुश्रीने केलेल्या आरोपांविरोधात कायदेशीर कारवाई नाना करणार आहेत. तर, बॉलिवूड मधील अनेक अमराठी कलाकार तनुश्रीच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तनुश्री आणि नाना पाटेकर वादात बॉलिवूड दुभंगल तर आहेच. पण या निमित्ताने अमराठी कलाकार जमातीचा दांभिकपणाही समोर आलाय. नाना पाटेकर यांच्याविरोधात बॉलिवूडमधील अमराठी टक्का एकवटताना दिसत आहे.

प्रियंका चोप्रासह बॉलिवूडच्या पहिला फळीतील कलावंतांनी सोशल मीडीयावरुन तनुश्रीला पाठिंबा दिलाय. सोनम कपूर, फरहान अख्तर, राधिका आपटे, अनुराग कश्यप, रिचा चढ्ढा, परिणिती चोप्रा, ट्विंकल खन्ना ,हंसल मेहता यांचे तनुश्रीला पाठिंबा देणारे ट्विट झाले आहेत. कलाकारांची ही पक्षपाती जमात आजवरच्या लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारी झाल्या तेव्हा मात्र हाताची घडी, तोंडावर बोट ठेऊन का बसली होती असा सवाल या निमित्ताने विचारला जातोय.

या प्रकरणांवर बॉलिवूडकर गप्प :

1) सलमान -ऐश्वर्या प्रेमप्रकरणात ऐश्वर्याने सलमानविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला. तरीही हे बॉलिवूडकर गप्प होते. 

2) धमकावल्या प्रकरणी सलमानविरोधात पत्रकार परिषद घेतल्यानंतर विवेक ओबरॉयचे करिअर संपले पण कुणीही बोलले नाही.

3) कंगनाने आदित्य पांचोलीविरोधात मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत केली. हे बॉलिवूडकर तेव्हाही पुढे आले नाहीत. 

4) प्रिती झिंटाने तिचा बॉयफ्रेंड आणि उद्योगपती नेस वाडियाविरोधात तक्रार केली. पण यावरही कुणी बोलले नाही. 

5) कंगना - ऋतिक रोशन वादानंतरही हे बॉलिवूडकर गप्प राहिले. 

6) जिया खानच्या आत्महत्या प्रकरणात आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीला अटक झाली. आरोपपत्र दाखल झाले जियाची आई एकटी लढत असताना तिच्या समर्थनार्थ कुणीही पुढे आले नाही.

7) अभिनेता अरमान कोहलीकडून त्याच्या मैत्रीणीला मारहाण झाली, गुन्हा दाखल झाला. यानंतर, अरमान कोहली फरार झाला. पुढं त्याला अटक होऊन सुटका झाली. त्यावरही बॉलिवूडमधून प्रतिक्रिया आली नाही.

पण, नाना पाटेकर यांच्या विरोधात ट्विट करायला मात्र हे सरसावले आहेत. नाना यांनी आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलंय आणि तनुश्रीच्या विरोधात कायदेशीर कारवाईची तयारी सुरू केलीय. मुख्य म्हणजे, तनुश्रीने केलेला आरोप यापूर्वीही केलाय. स्वतः सोबत झालेल्या अन्यायाची दाद कायद्याकडे मागावी असं तेव्हाही तनुश्रीला वाटलं नाही आणि आजही तिने अद्याप पोलिसात तक्रार केल्याचे समोर येत नाहीये. उलट माध्यमात अन्यायाचा पाढा वाचण्याचा तनुश्रीचा क्रम मात्र सुरू आहे. या प्रकरणी योग्य ती कायदेशीर व्हावी आणि सत्य समोर यावं. मात्र, आरोपांच्या आड राहात दुटप्पी भूमिका घेणाऱ्याचा चेहराही समोर यायला हवा.