अंगणवाडी सेविकांचा संप चिघळणार, शिवसेनेने दिलाय पाठिंबा

गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 20, 2017, 04:20 PM IST
अंगणवाडी सेविकांचा संप चिघळणार, शिवसेनेने दिलाय पाठिंबा title=

मुंबई : गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सरकार संप मागे घेण्यासाठी ठोस आश्वासन देत नसल्याने संप चिघळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, संप मागे घेतल्याशिवाय कोणत्याही वाटाघाटी होणार नाहीत, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेय. मात्र, आतापर्यंत ज्या ज्यावेळी चर्चा झाली तेव्हा आश्वासन दिले. मात्र, पुढे काहीही झालेले नाही. त्यामुळे संप मागे घेणार नसल्याची भूमिका अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे संप चिघळण्याची जास्त शक्यता आहे.

शिवसेना भवन येथे बुधवारी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव यांनी राज्यातील प्रत्येक शिवसैनिक अंगणवाडी ताईंच्या पाठिशी उभा राहील, अशी खात्री दिल्याचे कृती समितीचे नेते दिलीप उटाणे यांनी सांगितले. उटाणे सांच्यासोबत कृती समितीचे एम.ए. पाटील, शुभा शमीम, भगवान देशमुख या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. 

सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना यावेळी कृती समितीच्या नेत्यांनी मांडली. मात्र सरकारविरोधात प्रत्येक शिवसैनिक अंगणवाडी कर्मचारी आणि कृती समितीच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिलेय.

मानधनवाढीस प्रशासनाचा नकार

गतवर्षीप्रमाणे मानधनवाढ हवी असेल, तर संप मागे घ्या. संप मागे घेतल्याशिवाय कोणत्याही वाटाघाटी होणार नाहीत,  असा पवित्रा घेत, महिला व बालविकास विभागाने घेतलाय. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत सुरू असलेल्या चर्चेला मंगळवारी ब्रेक लावला आहे. मात्र, चर्चेसाठी बोलावून अशा प्रकारे नेत्यांचा पाणउतारा करणाऱ्या प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने संप अधिक तीव्रतेने पुढे नेण्याचा इशारा दिला आहे.

महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची तातडीची बैठक बोलावली होती. त्यात वित्त विभागाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव फेटाळल्याचे मुंडे यांनी सांगितले. 

प्रशासनाची वाईट वागणूक

शिवाय नवा प्रस्ताव तयार करण्यासाठी मंगळवारी सचिवांच्या नेतृत्त्वाखाली बैठकीचे आयोजन केले. मात्र, मंगळवारी दुपारी बैठकीसाठी गेले. यावेळी कृती समितीच्या नेत्यांना उभे राहूनच संप मागे घेतल्याशिवाय वाटाघाटी करणार नसल्याचे, सचिव विनिता वेद सिंघल यांनी सांगितल्याचा आरोप कृती समितीचे नेते दिलीप उटाणे यांनी केलाय. ही पद्धत चुकीची आणि वाईट वागणूक होती, असा ओराप करुन याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय.