तीच मुनगंटीवारांची गोड बातमी असेल- संजय राऊत

संजय राऊत यांचा मुनगंटीवारांना टोला

Updated: Nov 6, 2019, 08:12 PM IST
तीच मुनगंटीवारांची गोड बातमी असेल- संजय राऊत title=

मुंबई : भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीनंतर 'लवकरच गोड बातमी मिळेल' असा पुनरुच्चार भाजपा नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. यावर 'शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, ही गोड बातमी सुधीर मुनगंटीवारच देतील' असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावलाय.

भाजपानं सरकार स्थापनेचा दावा केला तर आम्हाला आनंदच आहे. आम्हीही राज्यपालांना तेच सांगितलं होतं. आमच्याशी भाजपानं कुठलीही चर्चा केलेली नाही. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी फोन करून कळवलं आहे की त्यांना राज्यात परिवर्तन हवंय. त्यांना शिवसेनेचं सरकार हवंय, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलंय.

'आमचेही दरवाजे खिडक्या उघड्या आहेत, परंतु, त्यातून डास, किडे येणार नाहीत याची आम्ही काळजी घेतोय' असा टोला त्यांनी भाजपाला लगावलाय.

अशोक चव्हाणांना टोला

'पर्यायांचा विचार करायचा असेल तर शिवसेनेनं आधी एनडीएमधून बाहेर पडावं' असा खोचक सल्ला वजा सूचना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलीय. तर सत्तास्थापनेबाबत शिवसेनेची ताठर भूमिका अद्याप कायम असल्याचं संजय राऊत यांच्या विधानांवरून स्पष्ट झालंय. अशोक चव्हाण यांच्या अनाहूत सल्ल्याबाबत बोलताना 'सेना युतीतून बाहेर पडणार का?' असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला गेला असता 'काँग्रेसचेही अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचं' राऊत यांनी प्रत्यूत्तर दिलं.

दरम्यान, बुधवारी राज्यातील काँग्रेस नेत्यांची एक बैठक मुंबईत पार पडली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीसाठी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख, विश्वजित कदम अशा वरच्या फळीतील नेते उपस्थित होते. यावेळी, 'काँग्रेसच्या ९० टक्के आमदारांना भाजपाचं सरकार नकोय, याबद्दल लवकरच पक्षश्रेष्ठींशी चर्चा करत आहोत' असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.