Omicron च्या पार्श्वभूमीवर मुंबईत कठोर नियमावली लागू

मुंबईकरांनो सर्व नियम काटेकोरपणे पाळा 

Updated: Dec 22, 2021, 08:41 AM IST
Omicron च्या पार्श्वभूमीवर मुंबईत कठोर नियमावली लागू  title=

मुंबई : 'हे वर्ष कठीण आहे, सांभाळून राहा', असं म्हणत मुंबईचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी कठोर नियमावली जाहीर केली आहे. मोकळ्या जागांवर होणा-या कार्यक्रमांवर पालिकेचे कठोर निर्बंध लादले आहेत. ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना मुंबईत कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबईकरांना दिला आहे. 

मुंबईत कठोर निर्बंध लागू 

मुंबईत मोकळ्या जागी- जसे रेसकोर्स, मोठी मैदाने येथे होणा-या  कार्यक्रमांना केवळ २०० लोकांनाच परवानगी- महापालिका प्रशासन

बॅन्क्वेट हॉल, बंदीस्त जागी क्षमतेच्या ५०%  मर्यादेपर्यंत प्रवेश

मोकळ्या जागांवर क्षमतेच्या २५% लोकांनाच परवानगी

कोणत्याही कार्यक्रमात दोन व्यक्तींमध्ये ६ बाय ६ चे अंतर ठेवणे गरजेचे

मोकळ्या जागांवर होणा-या मोठ्या पार्ट्यांकरता शासनाचे कठोर निर्बंध

मुंबईत मोकळ्या जागी- जसे रेसकोर्स, मोठी मैदाने येथे होणा-या जंगी कार्यक्रमांना केवळ २०० लोकांनाच परवानगी

राज्य शासनाच्या आदेशानुसार, ही कठोर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट ओमायक्रॉनच्या व्हेरिएंट सह जगभरात पसरली आहे. फक्त भारतातच 200 हून अधिक ओमायक्रॉनचे रूग्ण सापडले आहेत. असं असताना सरकारने मुंबईत कठोर नियमावली जाहीक केली आगे. 

जगभरात ओमायक्रॉनचा उद्रेक 

जगातील एकूण ८९ देशांमध्ये कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरिअंटचा (Omicron Variant) प्रसार झाला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिली आहे.

ज्या ठिकाणी कम्युनिटी ट्रान्समिशनची दाट शक्यता आहे अशा ठिकाणी ओमायक्रॉन व्हेरिअंट डेल्टाच्या तुलनेत वेगानं पसरण्याची अधिक शक्यता असल्याचंही डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. दिड ते तीन दिवसात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे.

डब्ल्यूएचओनं दिलेल्या माहितीमुळे आता संपूर्ण जगाच्या चिंतेत भर पडली आहे. संयुक्त राष्ट्रांनी आता ओमायक्रॉनचा सामना करण्यासाठीचा एक अहवाल देखील जारी केला आहे. यात ज्या ठिकाणी सामुदायिक संक्रमण अधिक वेगानं होत आहे अशा ठिकाणी डेल्टाची जागा ओमायक्रॉन घेईल असा इशारा देण्यात आला आहे.

अहवालातील माहितीनुसार १६ डिसेंबरपर्यंत ओमायक्रॉन जगातील एकूण ८९ देशांमध्ये पसरलेला असल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे. या विषाणूच्या व्हेरिअंटबाबत जितका अधिक डेटा उपलब्ध होईल तितकं अधिक त्याबद्दल जाणून घेता येईल असं डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

ओमायक्रॉनमुळे ब्रिटन आणि अमेरिकेत परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. युरोपात आता कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. ओमायक्रॉनमुळे कोरोना व्हायरसच्या नव्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आता युरोपीय देश लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत.

पॅरिसपासून बार्सिलोनापर्यंत अनेक नागरिकांना निर्बंधांना विरोध करण्यासही सुरुवात केली आहे. दुसरीकडे फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाचे मंत्री देखील महामारी वेगानं पसरत असल्यानं अलर्ट मोडवर आले आहेत. याठिकाणी विमान प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. फ्रान्सनं नववर्षात फटके फोडण्यावर बंदी घातली आहे. तर डेन्मार्कमध्ये थिएटर, कॉन्सर्ट हॉल, मनोरंजनाची ठिकाणं आणि संग्रहालयं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयर्लंडमध्ये पब आणि बारमध्ये रात्री ८ नंतर कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसंच कार्यक्रमांमध्ये उपस्थितांच्या संख्येवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. आयर्लंडच्या टास्कफोर्सनं लॉकडाऊन सदृश निर्बंध लादण्याच्याही सूचना सरकारला दिल्या आहेत.

ब्रिटन सरकारनं तर आता इमारतीत वावरताना मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावताना आणि नाइट क्लबमध्ये प्रवेशावेळा लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ब्रिटनमध्ये दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

ब्रिटनसह इतर काही देश आता कोरोना विरोधी लसीचा बुस्टर डोस देण्यासाठी वेगानं प्रयत्न करत आहेत. कारण प्राथमिक माहितीनुसार कोरोना लसीचे दोन डोस देखील ओमायक्रॉनवर कमी प्रभावी असल्याचं आकेडवारीवरुन दिसून आलं आहे.