ST bus strike - आत्महत्या करणाऱ्या लोकांचे मी नेतृत्व करत नाही - राज ठाकरे

ST bus strike  : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये घेण्यासाठी संप पुकारला आहे. संप अधिक चिघळत आहे.  

Updated: Nov 11, 2021, 01:24 PM IST
ST bus strike - आत्महत्या करणाऱ्या लोकांचे मी नेतृत्व करत नाही - राज ठाकरे title=

देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : ST bus strike  : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये घेण्यासाठी संप पुकारला आहे. संप अधिक चिघळत आहे. राज्य सरकारने कठोर निर्णय घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत 300 च्यावर कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. दरम्यान, संपकऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. राज यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवर नाराजी व्यक्त केली. आत्महत्या हा पर्याय नाही. मी आत्महत्या करणाऱ्या लोकांचे मी नेतृत्व करत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

एसटी कामगारांच्या प्रश्नी लक्ष घालतो, असे राज ठाकरे यांनी एसटी कर्मचारी आणि कामगारांना आश्वासन दिले. त्यावेळी नाराजीही व्यक्त केली. यावेळी एसटीच्या कर्मचारी शिष्टमंडळाने राज्यशासनात विलीनीकरण व्हावे यासाठी आपण प्रयत्न करावे, अशी विनंती राज ठाकरे यांना केली. एसटीच्या विलीनीकरणाबाबत अनेक वर्षांचा आमचा लढा आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास आमचे प्रश्न सुटतील, अशी व्यथा एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या पुढे मांडली.

एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने ‘ना काम, ना दाम’ यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. संपाला अन्य संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. या संपात भाजपनेही उडी घेतली आहे. मागणी मान्य होईपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले आहे. या संपामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार न्यायालयात गेले आहे. तसेच कारवाई करताना अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मात्र, संपकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.