मुख्यमंत्री दिल्लीत, राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल

महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळ बदलाच्या हालचालींना वेग आला आहे.  

Updated: Jun 6, 2019, 06:13 PM IST
मुख्यमंत्री दिल्लीत, राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल title=

मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळ बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले आहेत. दरम्यान, एसआरए गैरव्यवाहर प्रकरणी लोकायुक्तांनी ठपका ठेवलेले मंत्री प्रकाश मेहत यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेण्याबाबतची चर्चा मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे.

प्रकाश मेहतांना मिळणार डच्चू?

मुंबईतल्या ताडदेवमधील एसआरए गैरव्यवहार प्रकरणी मेहतांना भोवण्याची शक्यता आहे. आगामी मंत्रिमंडळाच्या फेरबदलात त्यांना डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या जागेवर भाजपाच्या वाटेवर असलेल्या विखेंना स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे. पुढील ३-४ दिवसांत मंत्रीमंडळ फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.  

राज्यात मंत्रीमंडळ फेरबदलाबाबत पध्दतशीरपण पावले टाकायला मुख्यमंत्री यांनी सुरुवात केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा मंगळवारी दिल्याने आता त्यांचा भाजपमधील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्राचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर उद्या रात्री भाजप कोर कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे. 

या सर्व घडामोड़ी सुरु असतांना एमपी मिल प्रकरणी लोकायुक्त यांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर ठपका ठेवल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मेहता यांच्यावर काय कारवाई होणार याची उत्सुकता आहे.

आपल्याला माहिती नाही - मेहता

दरम्यान, मुंबईतल्या ताडदेव इथल्या एसआरए गैरव्यवहारप्रकरणी लोकायुक्तांच्या कुठल्याही अहवालाबाबत आपल्याला माहिती नसल्याची प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी 'झी २४ तास'ला दिली. ताडदेव इथे एम. पी. मिल कम्पाऊंड एसआरए गैरव्यवहार प्रकरणी प्रकाश मेहता दोषी असल्याचा लोकायुक्तांनी ठपका ठेवलाय. 

दरम्यान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही सरकारवर टीका करण्याची संधी साधली असताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र याबाबत माहिती नसल्याचं सांगत हात वर केले आहेत.