मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी 120 किमी वेगमर्यादा; सरकारने जाहीर केली अधिसूचना

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्धाटन

Updated: Oct 7, 2022, 03:31 PM IST
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी 120 किमी वेगमर्यादा; सरकारने जाहीर केली अधिसूचना title=
(फोटो सौजन्य - PTI)

मुंबई : बांधकामापासून ते उद्धाटनापर्यंत गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील (samruddhi mahamarg) वेगमर्यादेबाबत (speed limit) महत्त्वाची माहिती समोर आलीय. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याच हस्ते लवकरच होईल. त्यासाठी त्यांच्याकडे वेळ मागण्यात आली आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यामुळे आता लवकरच समृद्धी महामार्गावरुन (Mumbai–Nagpur Expressway) लोकांना प्रवास करता येणार आहे. मात्र राज्य सरकारने यासाठी वेगमर्यादा घातलेली आहे.

हिंदूह़दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर कमाल 120 किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा असणार आहे. राज्याचे अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) कुलवंत कु. सारंगल यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केल आली आहे. तसेच, समृद्धी महार्गावर दुचाकी, चारचाकी रिक्षा अणि तीन चाकी रिक्षा, तसेच तीन चाकी कोणत्याही वाहनांना प्रवास करण्याची परवानगी नसणार आहे. 

वाहनचालकासह आठ प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी वेगमर्यादा 120 किमी. प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 100 किमी. प्रति तास असणार आहे. वाहनचालकासह 9 किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी 100 किमी प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 80 किमी. प्रति तास असणार आहे. माल आणि सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी 80 किमी. प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 80 किमी. प्रति तास वेगमर्यादा असणार आहे.