South Mumbai loksabha Seat Controversy : दक्षिण मुंबई... अर्थात महाराष्ट्राची राजधानी मुंबई... जिथून अख्ख्या महाराष्ट्राचा कारभार चालतो, ते मंत्रालय... जिथं कायदे बनतात ते विधानभवन... या कायद्यांवर शिक्कामोर्तब होतं ते राज भवन अशी सगळी सत्ताकेंद्र इथंच आहेत. ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया, जागतिक वारसा लाभलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, शेअर बाजार, रिझर्व्ह बँक, राणीची बाग, मुंबई महापालिकेचं मुख्यालय. मुंबादेवी आणि महालक्ष्मी मंदिर ही पवित्र देवस्थानं. हाजीअलीचा दर्गा. वरळी वांद्रे सी लिंक दक्षिण मुंबईतलाच. गीतानगरातल्या झोपडपट्टीपासून मलबार हिलच्या गर्भश्रीमंतापर्यंत सगळ्या थरातले लोक इथं राहतात. मात्र राजधानीचा भाग असूनही इथल्या अनेक समस्या कायम आहेत.
ट्रॅफिक जॅम ही दक्षिण मुंबईतील सर्वात मोठी समस्या आहे. गिरणगावातील अनेक इमारती जुन्या झाल्यात, मोडकळीस आल्यात. त्या चाळींचा पुनर्विकास हा मोठा प्रश्न आहे. अभ्युदयनगरसारख्या वसाहतींचा पुनर्विकास देखील रखडलाय. बीडीडी चाळ पुनर्विकासाचं काम धीम्या गतीनं सुरू आहे. कोस्टल रोड आणि मेट्रोच्या कामांमुळं नागरिक त्रस्त आहेत.
दक्षिण मुंबईचं राजकीय गणित
स. का. पाटील, जॉर्ज फर्नांडिस, मुरली देवरा अशा दिग्गजांनी दक्षिण मुंबईचं लोकसभेत प्रतिनिधीत्व केलंय. कधीकाळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र अलिकडच्या काळात शिवसेनेनं तो काबीज केला. 2009 मध्ये काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी मनसेच्या बाळा नांदगांवकरांचा सव्वा लाख मतांनी पराभव केला. 2014 मध्ये मोदी लाटेचा फायदा घेत शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार झाले. त्यांनी मिलिंद देवरांना हरवलं. 2019 मध्ये देखील याच निकालाची पुनरावृत्ती झाली. विधानसभेचा विचार केला तर शिवसेना ठाकरे गटाचे 2, भाजपचे 2, शिवसेना शिंदे गटाचा 1 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आलीय. ते विजयाची हॅटट्रिक करणार का? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. दुसरीकडं महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. काँग्रेसमध्ये असलेले मिलिंद देवरा आता शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभा खासदार आहेत. शिंदे गटाकडं सक्षम उमेदवार नाही. त्यामुळं भाजपनं ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा आहे.
इथं मराठी मतांचा टक्का मोठा आहे. ठाकरेंच्या उमेदवाराचा पाडाव करण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेला ही जागा सोडावी, असाही विचार महायुतीत चाललाय. तसं झाल्यास बाळा नांदगांवकर किंवा अमित ठाकरे उमेदवार असतील, अशीही चर्चा आहे. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केलीय. मात्र उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाडण्यासाठी राज ठाकरेंचा उमेदवार मैदानात उतरला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. तसं झाल्यास दक्षिण मुंबईत रंगतदार लढत पाहायला मिळेल.