'पंतप्रधानपदाची अपेक्षा नसलेले आम्ही 'तिघे', भाजपला हरवण्यासाठी देश पिंजून काढू'

पंतप्रधान कोण असेल, हा प्रश्न तुर्तास बाजूला सारावा. सध्या व्यावहारिक दृष्टीकोनातून राज्यस्तरीय युत्या कराव्यात.

Updated: Aug 6, 2018, 08:55 AM IST
'पंतप्रधानपदाची अपेक्षा नसलेले आम्ही 'तिघे', भाजपला हरवण्यासाठी  देश पिंजून काढू' title=

नवी दिल्ली: आगामी निवडणुकीपर्यंत विरोधकांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी आणि देवेगौडा यांच्यासह देश पिंजून काढण्याची माझी तयारी आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. मला पंतप्रधानपदाची अपेक्षा नाही, सोनिया गांधी व देवेगौडा यांनाही तशी आस नसावी, असे मला वाटते. त्यामुळे आम्ही तिघे देश पिंजून काढू. जेणेकरुन भाजपला सक्षम पर्याय असल्याचा विश्वास लोकांना वाटेल, असे पवार यांनी म्हटले. 

'दि हिंदू' या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी सविस्तरपणे आपली भूमिका मांडली. यावेळी शरद पवारांनी सध्याच्या परिस्थितीची तुलना १९७५-७७ च्या कालखंडाशी केली. त्या काळात इंदिरा गांधींना पर्यायच नाही, असा भ्रम सर्वत्र पसरला होता. आता मोदींच्याबाबतीत नेमकी तीच परिस्थिती आहे.

त्यामुळे आता विरोधकांनी राष्ट्रव्यापी आघाडीऐवजी राज्यस्तरावर एकत्र येण्याकडे लक्ष केंद्रित करावे. पंतप्रधान कोण असेल, हा प्रश्न तुर्तास बाजूला सारावा. सध्या व्यावहारिक दृष्टीकोनातून राज्यस्तरीय युत्या कराव्यात, असा पर्याय पवारांनी सुचवला. गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींशी झालेल्या चर्चेवरुन त्यांच्यात लक्षणीय सुधारणा झाल्याचे वाटते, असेही पवारांनी सांगितले.

इंदिरा गांधी यांच्या काळातही विरोधी पक्षांमध्ये दुही होती. मात्र, जयप्रकाश नारायण यांचा सल्ला मानून विरोधकांनी आपापसांतील मतभेद बाजूला सारले. सध्याच्या वातावरणात सोनिया गांधी, देवेगौडा आणि मी, आम्हा तिघांना पंतप्रधानपदाची अपेक्षा नाही, असे मी मानतो. मात्र, भाजपला पर्याय देण्यासाठी मला सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणायचे आहे, असे पवार यांनी सांगितले.