मुंबई: मुंबई हायकोर्टाने सोमवारी सोहराबुद्दीन चकमकप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत माजी एटीएसप्रमुख डी. जी. वंजारा यांच्यासह इतर पोलिसांना आरोपमुक्त केले.
कनिष्ठ न्यायालयाने डी.जी. वंजारा यांच्यासह इतर आरोपींची मुक्तता केल्यानंतर या निर्णयाला ५ आव्हान देण्यात आले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण गुजरातमधून मुंबईतील विशेष न्यायालयाकडे हस्तांतरित केले होते.
गुजरातमध्ये २००५ साली ही वादग्रस्त चकमक झाली होती. त्यानंतर या एन्काउंटरचा प्रमुख साक्षीदार तुलसीराम प्रजापती याचाही एन्काउंटर झाला़. त्यात अमित शहा आणि गुजरात पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा ठपका ठेवत सीबीआयने याचे आरोपपत्रही दाखल केले होते.
गुजरातमधील एक संशयित गँगस्टर सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसरबी यांचे गुजरात एटीएस आणि राजस्थान पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी हैदराबादजवळ अपहरण केले होते. त्यानंतर नोव्हेंबर २००५मध्ये एका बनावट चकमकीत त्याला ठार केले, असे आरोपपत्रात म्हटले होते.