धोब्याला वॉचमन बनवलं, पण त्यानेच घात केला! मुंबई हॉस्टेलमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Mumbai Hostel Murder Case: मुंबईत चर्चगेट परिसरात असणाऱ्या मुलींच्या वसतीगृहात एका मुलीची अत्याचारानंतर हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकुलत्या एका मुलीच्या जाण्याने वडिलांना अश्रू अनावर

राजीव कासले | Updated: Jun 7, 2023, 04:49 PM IST
धोब्याला वॉचमन बनवलं, पण त्यानेच घात केला! मुंबई हॉस्टेलमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा title=

Mumbai Hostel Girl Murder Case : तरुणीच्या हत्येनं मुंबई हादरलीय. चर्चगेट परिसरात (Churchgate) एका तरुणीवर अतिप्रसंग करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मुंबईतील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात (Savitribai Phule Women's Hostel) हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. आरोपीचं नाव ओमप्रकाश कनोजिया असून तो तब्बल 18 वर्षे या हॉस्टेलमध्ये वॉचमन (Watchman) म्हणून काम करत होता. घटनेनंतर हॉस्टेलमधील तो फरार होता. त्यामुळे  संशय बळावला. पोलीस त्याचा शोध घेत होते. पण त्याचा मृतदेह चर्नी रोड आणि ग्रँट रोड स्टेशनदरम्यान सापडला. त्यानं पीडितेवर अतिप्रसंग करून त्याने तिची हत्या केली आणि स्वतः रेल्वेखाली उडी मारून जीव दिला. मृत विद्यार्थिनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 

हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज या वसतीगृहाला भेट दिली. त्यांना मिळालेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. आरोपी ओमप्रकाश कनोजिया हा व्यावसायाने धोबी होता, पण मॅनेजमेंटचा त्याच्यावर विश्वास असल्याने त्याला वॉचमन बनवण्यात आलं. त्याची वृत्ती सुरुवातीपासूनच घाणेरडी होती, अशी तक्रार काही मुलींनी त्यांच्याकडे केली. धोब्याला वॉचमॅन बनवलं यासाठी परवानगी घेतली होती का? असा सनाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. मुली आपलं घरदार सोडून इथं शिकायला येतात. त्यांना सुरक्षित वातावरण मिळणं आवश्यक आहे, पण सुरक्षित वातावरण देण्यात वसतीगृहाचे वॉर्डन कमी पडले असा आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे. 

दरम्यान, मरिन ड्राइव्हवरील शासकीय वसतिगृहात 19 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्येची घटना चिंताजनक असल्याचं डॉ. निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. सर्व वसतीगृहात विद्यार्थींनीच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या नियम व कायद्यांची अंमलबजावणी व्हावी असंही निलम गोऱ्हेंनी म्हटलंय. 

काय आहे नेमकी घटना
मुंबईतली चर्चगेट परिसरात असणाऱ्या सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात राहणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्याच खोलीस आढळून आला. ही मुलगी विदर्भातून शिक्षणानिमित्ताने मुंबईत आली होती. ही मुलगी हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावर राहात होती आणि मंगळवारी संध्याकाळपासून तिच्या खोलीचा दरवाजा बंद होता. वसतीगृहातून ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केा असता मुलीचा मृतदेह आढळला. तिच्या गळ्याभोवती दुपट्टा गुंडाळण्यात आला होता. 

वसतीगृहाचा वॉचमनेच आरोपी
या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी वसतीगृहात तपास सुरु केला, तेव्हा वसतीगृहाचा वॉचमन फरार असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी तात्काळ त्याचा तपास सुरु केला.  मात्र, घटनेच्याच संध्याकाळी रेल्वे स्थानकावर संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

वडिलांचा गंभीर आरोप
दरम्यान वसतीगृहाच्या डीनवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मृत मुलीच्या वडिलांनी केलीय. गुन्हे दाखल न केल्यास मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा तरुणीच्या वडिलांनी दिलाय. आपल्या मुलीला वसतीगृहाच्या चौथ्या मजल्यावर एकटीलाच ठेवण्यात आलं होतं, तिच्याबरोबर इतर कोणाला का ठेवलं नाही, असा सवालही मृत मुलीच्या वडिलांनी विचारला आहे.