मुंबई : बऱ्याचदा काही वस्तुंचे सारखेच पॅकेजिंग असल्यामुळे आपल्या वस्तुंमधील फरक कळत नाही. ज्यामुळे मोठ्यांकडून देखील चुका होतात मग छोट्यामुलांनचा तर गोंधळ उडणारच. अशाच वस्तुच्या पॅकेजिंगच्या गोंधळामुळे एका मुलीचा जिव गेला आहे. या मुलीने टूथपेस्ट समजून चुकून उंदीर मारणाऱ्याच्या औषधाने ब्रश केले ज्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.
या मुलीचे नाव अफसाना खान आहे आणि अफसानाचे वय 18 वर्षे होते. ही घटना मुंबईतील धारावी भागातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी उठल्यानंतर ती अर्धा झोपेत होती. त्यामुळे झोपेतच तिने टूथपेस्ट ऐवजी, ब्रशला उंदराचे औषध लावले आणि दात घासू लागली. औषध तोंडात जाताच तिला त्याची चव वेगळी लागली, तेव्हा तिच्या ही गोष्ट लक्षात आली आणि तिने लगेच ते औषध थूकले आणि चूळ भरली. परंतु तो पर्यंत तिला चक्कर आली आणि ती खाली पडली.
यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तिला लगेच रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु करेपर्यंत विष तिच्या संपूर्ण शरीरात पसरले. ज्यामुळे रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. अफसानाच्या कुटुंबात आई, तिची एक मोठी बहीण आणि दोन भाऊ आहेत.
अफसानाची आई फळे विकून कुटुंबाचा खर्च उचलत आहे. अफसानाची खूप मोठी स्वप्न होती, तिला खूप शिकायचं होतं, त्यासाठी तिची आई देखील खूप मेहनत करत होती. परंतु तिच्या अशा जाण्याने संपूर्ण कुटुंब शोकसागरात आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी जनतेला असे आवाहन केले आहे की अशा विषारी वस्तू घरात अशा ठिकाणी ठेवू नयेत जे सहज हातात येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही देखील हे लक्षात ठेवा आणि आपल्या मुलांवर देखील लक्ष ठेवा.