मुंबई : दिवाळीच्या सुट्टीत मोठ्या आनंदात ती आजोबांच्या घरी आली. आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर ती लपाछपी खेळत होती. पण तो खेळ तिच्या आयुष्यातला शेवटचा खेळ ठरला. इमारतीच्या लिफ्ट दुर्घटनेत (Lift Accident) 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. मुंबईतल्या (Mumbai) मानखुर्दमध्ये (ManKhurd) ही दुर्देवी घटना घडली आहे. लिफ्टमध्ये डोकं अडकून रेश्मा खारावी (Reshma Kharavi) या मुलीचा मृत्यू झाला. मृत मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनंतर याप्रकरणी दोन लोकांना अटक करण्यात आलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
काय आहे नेमकी घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेश्मा खारावी आपल्या आजोबांच्या मानखुर्द इथल्या घरी सुट्टीसाठी आली होती. शुक्रवारी ती सोसायटीत आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर लपाछपी खेळत होती. रेश्मावर राज्य आल्याने बाकीचे मित्र-मैत्रिण लपले. त्यांना शोधण्यासाठी रेश्माने लिफ्टच्या मोकळ्या जागेतून डोकावलं. पण तितक्यात वरून खाली जाणारी लिफ्ट तिच्या डोक्यावर आदळली. रेश्माच्या किंकाळ्यांनी आसपासची लोकं जमा झाली.
तिच्याबरोबर खेळणाऱ्या काही मुलींनी ही गोष्ट रेश्माच्या कुटुंबियांना सांगितली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रेश्माला त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, त्याआधीच रेश्माचा दुर्देवी मृत्यू झाला होता. मृत रेश्माच्या कुटुंबियांनी सोसायटीवर निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे. कुटुंबियांच्या आरोपानंतर पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घेतली.