शिवसेनेचा जन्म कोणाची पालखी वाहण्यासाठी नाही, स्वाभिमानाने पुढे जावू: उद्धव ठाकरे

स्वबळ म्हणजे निवडणुका नाही. उद्धव ठाकरे यांचा काँग्रेसला टोला

Updated: Jun 19, 2021, 07:32 PM IST
शिवसेनेचा जन्म कोणाची पालखी वाहण्यासाठी नाही, स्वाभिमानाने पुढे जावू: उद्धव ठाकरे title=

मुंबई : शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनादिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत होते. यावेळेस त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा देणाऱ्या पक्षांना ही टोला दिला. 

स्वबळ म्हणजे निवडणुका नाही

अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. आपण ही स्वबळाचा नारा देऊ. स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणं नाही. न्यायहक्कासाठी स्वबळ पाहिजे. पराभूत मानसिकता घात करते. स्वबळाचा नारा हा आमचा हक्क आहे. अन्याय विरुद्ध लढा हे आमचं स्वबळ आहे. 

हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व

हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे. मग आमची प्रादेशिक अस्मिता आहे. एक देश अनेक भाषा हे जगाच्या पाठीवरच एकमेव उदाहरण आहे. संकट काळात शिवसेना मदतीसाठी सरसावते. 

बंगालने स्वबळाचा अर्थ दाखवला

बंगालने स्वबळाचा खरा अर्थ दाखवून दिला. ममतांनी बंगालची ताकद दाखवून दिली. राजकारण आता वळत चाललं आहे. राजकारणाची उंची काय आहे हे सगळ्यांना कळतं आहे. राजकारणात जे चाललं आहे ते दिसतंय. राजकारणाचं विकृतीकरण सुरु आहे.

शिवसैनिकांवर टीका होतात. पण नुसतं हाणामाऱ्या करणं शिवसैनिकांची ओळख नाही. ५५ वर्ष ही साधी वाटचाल नाहीये. शिवसेना अजूनही पुढे जात आहे.

कोरोनाचे संकट कायम 

कोरोनाचं संकट किती काळ चालले हे सांगता येत नाही. कोविड आणि पोस्ट कोविडनंतर रुग्णांवर विपरीत परिणाम होत आहे. लॉकडाऊन तात्पुरता मार्ग आहे. रोजगारावर परिणाम होत आहे. माझं काय होणार यामुळे देशातील लोकं अस्वस्थ आहे. याचा विचार न करता स्वबळाचा नारा देणं चुकीचं. हा विचार केला नाही तर देश हा अराजकतेकडे चाललाय हे निश्चित. सर्व पक्षांनी निवडणुका, सत्ताप्राप्ती हा विचार बाजुला ठेवून, आरोग्यानंतर आर्थिक संकटाचा सामना कसा करायचा हा विचार केला पाहिजे.

'कोणाचीही पालखी वाहणार नाही'

सत्तेसाठी कधीही लाचार होणार नाही. उगाचच कोणाची तरी पालखी ही वाहणार नाही. शिवसेनेचा जन्म पालखी वाहण्यासाठी नाही. आम्ही स्वाभिमानाने चालू. हे शिवसैनिकाचं ब्रिद आणि हीच आपली तादक आहे.