मुंबई : शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (BJP) धमकीवजा इशारा दिला आहे. भाजपचे साडेतीन नेते लवकरच तुरुंगात असतील, असा बॉम्बगोळा राऊत यांनी टाकला आहे. भाजपचे ते साडे तीन नेते कोण आहेत, तसंच राऊत आज असा काय गौप्यस्फोट करणार आहेक, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (shivsena fire brand leader and mp sanjay raut will take press confrence 15 february 2022 in shivsena bhavan against bjp)
संजय राऊत यांनी भाजप विरोधात रोखठोक आणि खळबळजनक गौप्यस्फोट करण्याचा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला. सध्या जेलमध्ये असलेल्या अनिल देशमुखांच्या जागी भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी त्यांनी दिली आहे.
शिवसेनेच्या वतीनं आज शिवसेना भवनात विशेष पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे तमाम खासदार, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी असा सगळा फौजफाटा तिथं उपस्थित आहेत.
संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि कुटुंबीय हे गेल्या काही दिवसांपासून ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. राऊतांनी मंगळवारच्या पत्रकार परिषदेचं ट्वीट करताना NO HOLDS BARRED असा उल्लेख केला आहे.
योगायोग म्हणजे केंद्रीय लघु सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या राजकीय आत्मचरित्राचं नाव देखील NO HOLDS BARRED असंच आहे. त्यामुळं राऊतांचा इशारा नेमका कुणाला उद्देशून आहे, याबाबत नानाविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
कधी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून, तर कधी राज्यपालांच्या भूमिकेवरून भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद सुरू आहे. आता शिवसेना मंगळवारी जो गौप्यस्फोट करणाराय, त्यानंतर भाजप विरुद्ध शिवसेना वादाचा नवा अध्याय पाहायला मिळेल.
तसेच ज्या प्रमाणे संजय राऊत यांनी भाजप विरोधात दंड थोपाटले आहेत, त्यावरुन ते टप्प्यात कार्यक्रम करतील, अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे आता आज नक्की काय होतं, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.