मुंबई: रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी अमृतसरमध्ये झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केंद्र सरकारला धारेवर आहे. विकास आणि प्रगतीच्या गोष्टी आम्ही करतो, पण रेल्वे यंत्रणा साफ भंगारात गेली आहे. सिग्नल यंत्रणा, तडे गेलेले रूळ, वेळापत्रक सुविधा यांची बोंब असताना राज्यकर्ते 'बुलेट ट्रेन'च्या नावाने दांडिया खेळतात याचे आश्चर्य वाटते, असा टोला शिवसेनेने मुखपत्र असलेल्या 'सामना'तील अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
या अग्रलेखात शिवसेनेने रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्यावरही अप्रत्यक्षपणे शरसंधान साधण्यात आले आहे. रेल्वेचे खाते म्हणून जो काही पसारा आहे, त्याचे नक्की काय चालले आहे? कुणाला कुठेतरी कामधंद्याला चिकटवून टाकायचे अशा पद्धतीने महत्त्वाच्या खात्यांवर मंत्री म्हणून लोकांना चिकटवले आहे. त्यांचा सारा वेळ पक्षाची वकिली करण्यातच जातो, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
याशिवाय, शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पावरही टीका केली. देशात माणसे किड्यामुंग्यांसारखी मरत आहेत. मात्र, राजकीय पक्ष एकमेकांना दोष देण्यात मग्न आहेत. गोरखपूरच्या सरकारी इस्पितळात प्राणवायूअभावी शंभर बालके दगावली ही मनुष्यचूक तशीच अमृतसरचा रेल्वे अपघात ही मनुष्यचूक आहे. रेल्वेने लोकांना चिरडले. त्या रेल्वेगाडीच्या चालकाचा तरी दोष काय? असे अपघात यापूर्वी झाले व यापुढेही होतील, पण सत्ताधारी मात्र बुलेट ट्रेनच्या धुंदीत जगत असतात. त्याच धुंदीचे हे बळी आहेत, अशा शब्दांत शिवसेनेने मोदींना लक्ष्य केले आहे.