मुंबई: यवतमाळच्या पांढरकवडा जंगलातील अवनी (टी १) वाघिणीला वनखात्याने ठार मारल्यानंतर शिवसेनेने भाजपवर शरसंधान साधले आहे. सरकारने अवनीला भेकडासारखे मारले, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आली.
टी १ वाघिणीला जेरबंद करण्याचा प्रयत्न न करता तिच्यावर थेट गोळ्या झाडण्यात आल्या, असा वन्यप्रेमींचा आरोप आहे. त्यामुळे वनखात्याच्या कृतीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावरूनच शिवसेनेने सरकारला लक्ष्य केले. दुष्काळ, उपासमार, कुपोषण सरकारी अनास्था, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा यामुळे राज्यात माणसे मरत आहेत. मात्र त्यासाठी कोणीही व्यवस्थेला नरभक्षक ठरवत नाही. मात्र, वन्य प्राण्यांना नरभक्षक ठरवून शिक्षा दिली जाते. ज्या राज्यात माणसेही नीट जगू शकत नाहीत त्या राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? तुला भेकडासारखे मारले. रात्रीच्या अंधारात उंदरांनाही वाघाचे बळ येते, असा टोला सेनेने भाजपला लगावला.
दरम्यान, केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीदेखील रविवारी फडणवीस सरकारच्या या निर्णयावर टीका केली होती. टी १ वाघिणीला मारण्यासाठी नवाब शफाअत अली खान यांना पाचारण करण्याच्या वनखात्याच्या निर्णयावर त्यांनी बोट ठेवले होते.
वाघिणीची हत्या केल्याने मी खूप दु:खी आहे. चंद्रपुरात शहाफत अली खान यानं आतापर्यंत ३ वाघ, १० बिबट्या, अनेक हत्ती आणि जवळपास ३०० रानडुकरांची हत्या केली आहे. अशा माणसाला तुम्ही अमानवी कृत्य करण्यासाठी कसं काय नेमू शकता, असा सवाल त्यांना विचारला होता. या प्रकरणी मी राजकीय आणि कायदेशीर कारवाईचा विचार करत असल्याचा इशाराही मनेका गांधी यांनी दिला.