कोकणसह राज्यात काही ठिकाणी पाऊस

कोकण जोरदार वाऱ्यासह चांगला पाऊस पडला. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. 

Updated: Nov 5, 2018, 08:44 AM IST
कोकणसह राज्यात काही ठिकाणी पाऊस title=
छाया : सायली पाटील, मुंबई

मुंबई : राज्यातला बहुतांश भाग दुष्काळाच्या छायेत असताना ऐन दिवाळीत पाऊस येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. तो अंदाज खरा ठरला. काल कोकण जोरदार वाऱ्यासह चांगला पाऊस पडला. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. तर सिंधुदुर्गात मालवण किनारपट्टीवरील रविवारी सायंकाळी लखलखाट आणि गडगडाटासह जोरदार पावसाने तडाखा दिला. देवबाग येथील मडईकर रापण संघाच्या होडीवर वीज पडल्याने होडी फुटून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. यावेळी किनारपट्टीवर असलेले दोन मच्छीमार जखमी झाले आहे.  

नाशिक, बुलडाणा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये काल पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली.  तर रायगडमध्ये महाड, पोलादपूर माणगाव परीसरात वादळी वारयासह आलेल्या पावसामुळे कापलेल्‍या भातपिकांचं नुकसान झालंय. 

आज दुसऱ्या दिवशी मुंबई आणि कोकण भागात आकाश ढगाळलेले दिसून येत आहे. नवी मुंबईत पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास तुरळक पाऊस पडला. त्यामुळे हवेत गारवा होता. आजही मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांत पावसाची शक्यता असल्याचा हवामान खात्यानं म्हटलंय. कर्नाटकात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवलीय आहे.

या हवामानाच्या स्थितीचा काही परिणाम सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यातही दिसून येईल. त्यामुळे दुष्काळी मराठवाड्याला दिलासा मिळणार का याकडं नजरा लागल्यात. हा पाऊस झाल्यास ज्वारी, बाजरी आणि कापसाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.