मुंबई: राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, अशी गर्भित धमकी देणाऱ्या भाजपला शिवसेनेने शिंगावर घेतले आहे. भाजपला राष्ट्रपती आपल्या खिशातच आहे, असे वाटते की काय, असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून उपस्थित करण्यात आला आहे. यामुळे आता शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद आणखी चिघळू शकतो.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत वेळ पडल्यास शिवसेना आवश्यक बहुमताची जुळवाजुळव करून सरकार स्थापन करू शकते, असा इशारा भाजपला दिला होता. त्यामुळे भाजपने दिलेला शब्द पाळावा. अन्यथा उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही पर्याय उरणार, असे राऊत यांनी म्हटले होते.
तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपकडून शिवसेनेला निर्वाणीचा इशारा
शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने या आगीत आणखीनच तेल ओतले गेले. शिवसेना भाजपमधील पेच सुटला पाहिजे. 'मी बांधेन ते तोरण, मीच करेन ते धोरण', असा पवित्रा घेऊन चालणार नाही. जनतेच्या हितासाठी दोन्ही पक्षांना चर्चेतून मार्ग काढावा लागेल. अन्यथा राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा लागेल. ८ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर घटनेच्या तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असे मुनगंटीवार यांनी म्हटले होते.
राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग; 'या' सहा कॉम्बिनेशन्सची चर्चा
मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याचा 'सामना'तून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली धमकी लोकशाहीविरोधी तसेच घटनाबाह्य आहे. त्यांच्या या वक्तव्यातून भाजपची कायदा किंवा घटनेची गळचेपी करून हवे ते साध्य करायचे, ही भूमिका दिसून येते. राष्ट्रपती आमच्या मुठीतच आहेत. त्यांच्या सहीशिक्क्याचा रबरी स्टॅम्प भाजप कार्यालयातच पडून आहे. आमचे राज्य आले नाही तर महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादू शकतो, असे भाजपला वाटते. मात्र, राष्ट्रपती ही घटनेतील सर्वोच्च संस्था आहे. तेथे व्यक्ती नाही तर देश आहे. देश कुणाच्या खिशात नसतो, असे शिवसेनेने ठणकावून सांगितले आहे.