'शिवसेनेत भूकंप होणार'; आमदार रवी राणांचा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनासोबत घेऊन राज्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Updated: Nov 24, 2019, 09:43 PM IST
'शिवसेनेत भूकंप होणार'; आमदार रवी राणांचा गौप्यस्फोट title=

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनासोबत घेऊन राज्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार हे राष्ट्रवादीशी बंडखोरी करुन उपमुख्यमंत्री झाले आहेत. यानंतर आमदार रवी राणा यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. ही भेट घेतल्यानंतर रवी राणा यांनी शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेमध्ये भूकंप होणार असून मोठा गट हा भाजपसोबत येणार आहे, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी आपण भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येतील, असं सांगितलं होतं याची आठवणही रवी राणा यांनी करुन दिली. शरद पवार यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही, असं सांगितल्याचं रवी राणांना विचारलं. तेव्हा ये अंदर की बात है, असं रवी राणा म्हणाले आहेत. 

शिवसेनेचे आमदार हे त्रस्त झाले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे आमदार फुटणार आहेत, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे. आमचा आकडा हा १७५च्या वर असेल, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.