कुछ तो गडबड है! आमदार फुटले की पाठवले? कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या गोटात संशयाचं वातावरण

महाविकास आघाडीमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असतानाच संशयाचं वातावरण देखील निर्माण होताना दिसत आहे. 

Updated: Jun 23, 2022, 11:06 AM IST
कुछ तो गडबड है! आमदार फुटले की पाठवले? कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या गोटात संशयाचं वातावरण title=

सागर कुलकर्णी, मुंबई : महाविकास आघाडीमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असतानाच संशयाचं वातावरण देखील निर्माण होताना दिसत आहे. शिवसेनेच्यामध्ये बंडाळी निर्माण झाली. त्यात एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार जाताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत जे आमदार उपस्थित होते, ते देखील आता शिंदे गटात जाताना दिसत आहेत.

या सर्व घडामोडींमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती 'झी24तास' ला मिळाली आहे. 

यापूर्वी शिवसेनेत अनेक नेत्यांनी बंड केले. पण त्यांच्या पाठीमागे देखील इतके आमदार कधीही गेले नाही. मग एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे इतके आमदार कसे काय? शिवसेनेचे निष्ठावंत आणि उद्धव ठाकरे यांचे अतिशय निकटवर्ती आमदार देखील शिंदे यांना पाठिंबा कसे देतात? हे आमदार स्वतःहून जात आहेत की त्यांना शिवसेनेतच कोणी मोठा नेता जाण्याचा सल्ला देत आहे? असा सवाल देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते उपस्थित करीत आहेत. काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत देखील या संदर्भात सूर उमटला आहेत. 

शिवसेनेत याआधी छगन भुजबळ गणेश नाईक नारायण राणे राज ठाकरे यासारख्या दिग्गज नेत्यांनी नाराजी व्यक्त करत बंड पुकारले होते. मात्र त्यांच्या पाठीमागे देखील इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे आमदार कोणीच गेले नाही. आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे इतके आमदार कसे जात आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

याबाबत एका वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्यांनी 'झी24तास'ला नाव न घेण्याच्या अटीवर भूमिका मांडली की, एकनाथ शिंदे मोठे नेते आहे पण त्यांच्या मागे शिवसेनेचे इतके मोठे इतके आमदार मागे जाताहेत, याविषयी शंका उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्याविषयी नाराजी असू शकते पण इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार बाहेर पडतील याविषयी शंका वाटतेय.

याबाबत 'झी24तास' ने प्रथम प्रश्न उपस्थित करत आमदारांना स्वतःहून जात आहे की पाठवले जात आहे? हा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतरच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये  अशा स्वरूपातल्या प्रतिक्रिया उमटत आहेत.