मुख्यमंत्र्यांना काही हौस नाही, संजय राऊत यांनी विरोधकांना टोकले

मंदिरे उघडावीत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे, पण जनतेच्या आरोग्यासाठीच मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत, असे संजत राऊत म्हणाले.

Updated: Sep 3, 2020, 01:47 PM IST
मुख्यमंत्र्यांना काही हौस नाही, संजय राऊत यांनी विरोधकांना टोकले  title=
संग्रहित छाया

मुंबई : मंदिरे उघडावीत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे, पण जनतेच्या आरोग्यासाठीच मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांना काही हौस नाही. योग्यवेळ आल्यावर त्यावर निर्णय होईल. केवळ विरोधकासाठी राजकारण करु नका आणि मुळात जनतेचे आरोग्य जपण्यासाठी सर्व सुरु आहे. जनतेचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी मंदिरे बंद आहे, असे सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री प्रोटोकॉल पाळूनच मुंबईतून कारभार करत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

मंदिरे उघडावीत अशी मुख्यमंत्र्यांचीही मनापासून इच्छा आहे. मात्र गर्दी टाळण्यासाठी, जनतेचे आरोग्य राखण्यासाठी मंदिरं बंद असल्याच् खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. विरोधकांनी विरोधासाठी विरोध करू नये, असे त्यांनी खडसावले. औरंगाबाद, पंढरपूरमध्ये झालेल्या आंदोलनात नियमांचा फज्जा उडाल्याचे ते म्हणाले. मुंबईत काल कोरोना रुग्णांचा अचानक आकडा वाढला. महाराष्ट्र आणि देशातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्याच्यात भर पडू नये आणि लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची भावना असेल तर भूमिका समजून घेतली पाहिजे. विरोधकांनी त्यावर मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा केली पाहिजे. रस्त्यावर उतरुन अधिकचे संकट वाढवू नये. लोकांच्या जीवाशी खेळू नका. संयम बाळगणे महत्वाचे आहे. घाई करुन चालणार नाही, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केले. 

विरोधकांना सरकारकडे मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. ते सुद्धा लोकशाहीचे,  घटक आहेत. भूमिका मांडण्याचा त्यांनाही अधिकार आहे. पण हे करताना भान ठेवले पाहिजे. ही वेळ मंदिर उघडण्याची नाही हे सरकारला वाटत असेल तर समजून घ्या. महाराष्ट्र सरकार कोरोनाला देवाची करणी मानत नाही. या संकटाशी आपल्याला लढायचे आहे, हे माहिती असतानाही विरोध असे वागत असतील तर हे जनतेच्या हिताचे नाही, असे ते म्हणाले. 

सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे घटनेत लिहीलेय का, असा सवाल त्यांनी केला. बदल्या राज्याच्या हिताच्या असल्याचे ते म्हणाले. तर मुख्यमंत्री दौरा करत नसल्याच्या विरोधकांच्या आरोपालाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची कामाची पद्धत सारखीच असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही दिल्लीतूनच काम करत आहेत, ही काळाची गरज आहे असे राऊत म्हणाले. 

मुंबईत परतू नये म्हणून राऊतांनी धमकी दिल्याच्या आरोपांवर संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत, असे राऊत म्हणालेत.