काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले; शेलारांचा शिवसेनेला टोला

शिवसेनेने देशात येणाऱ्या हिंदूंना मतदानाचा हक्क नको, अशी भूमिका घेतल्याचे शेलार यांनी म्हटले.

Updated: Dec 12, 2019, 08:11 AM IST
काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले; शेलारांचा शिवसेनेला टोला title=

मुंबई: राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या CAB मंजुरीवेळी सभात्याग करणाऱ्या शिवसेनेवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले, असा टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला. देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. मात्र, आज त्यांच्याच शिवसेनेने देशात येणाऱ्या हिंदूंना मतदानाचा हक्क नको, अशी भूमिका घेतल्याचे शेलार यांनी म्हटले. त्यामुळे आता शिवसेना शेलारांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही बुधवारी राज्यसभेतील भाषणादरम्यान शिवसेनेवर आसूड ओढले होते. महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेने सांगावे की रात्रीत असं काय घडलं की, शिवसेनेने राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा का दिला नाही ? या विधेयकाला विरोध करणारे देशद्रोही आहेत, असे आम्ही कधीच म्हटले नव्हते. सत्तेसाठी लोक कसे रंग बदलतात, अशी टीकाही शहा यांनी केली.

भाजपने दडपशाहीने CAB मंजूर करवून घेतले- संजय राऊत

लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने बुधवारी राज्यसभेत विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली. परंतु मतदानावेळी शिवसेनेचे तीनही खासदार गैरहजर राहिले. काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने विधेयकाला विरोध केला असला तरी प्रत्यक्ष मतदान विरोधात न करून एकप्रकारे सत्ताधारी भाजपलाच मदत केल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने राज्यसभेत भूमिका बदलल्याचा आरोपही राऊत यांनी फेटाळून लावला आहे. आम्ही कोणाच्याही दबावतंत्राला घाबरत नाही. आम्ही संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) सदस्य नाही. भाजपसोबत असतानाही आम्ही आमच्या भूमिका मांडतच होतो. या विधेयकाला विरोध करणारे देशद्रोही आणि पाठिंबा देणारे देशभक्त असे सांगितले जात आहे. पण कोणीही शिवसेनेला देशभक्ती शिकवू नये. तुम्ही (भाजप) ज्या शाळेचे विद्यार्थी आहात, त्या शाळेचे आम्ही (शिवसेना) हेडमास्तर आहोत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, श्यामाप्रसाद मुखर्जी हे सगळे या शाळेचे हेडमास्तर होते, असे राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.