मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राजकीय पटलावर केंद्रस्थानी आलेल्या शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी आणखी सूचक इशारा दिला. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत राऊत यांनी 'लक्ष्य तक पहुचने से पहले सफर मे मजा आता है' असा संदेशही लिहला आहे. त्यामुळे आता राऊत यांच्या या फोटोमागील नेमका अर्थ काय, याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने समसमान सत्तावाटपासाठी आग्रह धरला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यात अशी कोणतीही बोलणी झाली नव्हती, असे सांगत शिवसेनेची मागणी धुडकावून लावली होती. यानंतर शिवसेना कमालीची आक्रमक झाली. संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून पत्रकारपरिषद आणि ट्विट करण्याचा सपाटा लावला असून ते दररोज भाजपला नवनवे इशारे देत आहेत. कालच झालेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी शिवसेनेकडे १७० पेक्षा अधिक आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा केला होता. त्यामुळे आमचा मुख्यमंत्री शिवतीर्थावरच शपथ घेईल, असेही राऊत यांनी म्हटले होते.
जय हिंद pic.twitter.com/AGfKbpVo0i
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 4, 2019
दरम्यान, आज दिल्लीत महत्त्वाच्या राजकीय बैठका होत आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत. निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री फडणवीस भाजपश्रेष्ठींना भेटणार आहेत.तर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारही दिल्लीत दाखल झाले असून ते आजा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.