मुंबई : मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस-शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले असता जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा हे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी आलेले असताना दोघांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थी करावी लागली.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज भरण्यापूर्वी अरविंद सावंत यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलंय. शिवसैनिकांसह भाजपाचेही कार्यकर्ते आणि नेतेही यावेळी उपस्थित होते. तर अरविंद सावंत यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कोणत्याही शक्तिप्रदर्शनाशिवाय मिलिंद देवरा यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. अरविंद सावंत आणि मिलिंद देवरा यांच्यात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात लढत रंगणार आहे.
उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी मिळालेल्या प्रिया दत्त अर्ज दाखल केला. यावेळी प्रिया दत्त यांच्यासोबत तिचा भाऊ संजय दत्तही तिच्यासोबत होता. अर्ज दाखल करण्याआधी प्रिया दत्त यांनी मंदिर, चैत्यभूमी आणि दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलं. प्रत्येक निवडणूक हे आव्हान असतं त्यामुळे तयारी ही करावीच लागते, मला नक्की यश मिळेल असा दावा प्रिया दत्त यांनी यावेळी केला. तर संजय दत्तनेही आपल्या बहिणीला यश मिळावं यासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचं सांगितलं.
दरम्यान प्रिया दत्त उमेदवारी अर्ज भरताना तिथेच उर्मिला मांतोडकर आणि संजय निरुपम देखील पोहचले. मात्र प्रिया दत्त यांनी संजय निरुपम यांच्या समोर जाणे टाळलं. त्यामुळे काँग्रेसमध्ये अजूनही समन्वयचा अभाव, हेवेदावे कायम असल्याचंच जणू दिसून आलं.