कल्याण : उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कल्याणमधल्या एका शिवसैनिकाने तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणून काल ५ रुपयांमध्ये वडापाव विक्री केली. ५ रुपयांमध्ये वडापाव खाण्यासाठी ग्राहकांनीही गर्दी केली होती.
हॉटेल व्यावसायिक आणि शिवसैनिक असलेल्या दिनेश शेटे यांनी २९ तारखेला ५ रुपयांमध्ये वडापाव विक्री केली. त्यांच्या हॉटेलबाहेर ५ रुपयांमध्ये वडापाव खाण्यासाठी ग्राहकांची रांग लागली होती. कल्याणमधल्या टिळक चौक परिसरामध्ये दिनेश शेटे यांचं चविष्ट हे हॉटेल आहे. याआधी वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतरही दिनेश शेटे यांनी एक दिवस ५ रुपयांमध्ये वडापाव दिला होता.
'उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री होणं हा आमच्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण आहे. क्रिकेट मॅच असू दे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वाढदिवस असू दे किंवा आमचा मुख्यमंत्री असू दे, आमचा आनंद आम्ही कायम लुटत असतो,' अशी प्रतिक्रिया दिनेश शेटे यांनी दिली आहे.