मोदी जगात आणि शाह देशात संपर्क मोहीम - शिवसेना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर 'सामना'च्या अग्रलेखातून तोंडसुख घेण्यात आले आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 6, 2018, 07:04 PM IST
मोदी जगात आणि शाह देशात संपर्क मोहीम - शिवसेना title=

मुंबई : पालघरची लोकसभा पोटनिवडणूक हरल्याची सल शिवसेनेच्या मनात कायम आहे. यावरुन भाजपला पुन्हा शिवसेनेने टोकलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर 'सामना'च्या अग्रलेखातून तोंडसुख घेण्यात आले आहे. पालघर साम, दाम, दंड, भेदाने जिंकले तसे साम, दाम, दंड, भेद वापरून शेतकरी संप मोडून काढू असेच जणू सुरू आहे. अशा परिस्थितीत मोदी जगात व शाह देशात संपर्क मोहीम राबवत आहेत. त्यांच्या संपर्क कलेचे कौतुक करावे तेवढे थोडेच!, अशी उपरोधीक टीका शिवसेनेने केलेय.

शिवसेनेला ‘पोस्टर बॉय’ची गरज नाही!

भाजपच्या संपर्क अभियानामागे २०१९च्या सार्वत्रिक निवडणुका हे एक कारण होऊ शकते; पण मुळात सरकार पक्षाचा जनतेशी संपर्क तुटला आहे. त्यामागची कारणे शोधायला हवीत, असा चिमटा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलाय. दरम्यान, शिवसेनेसारखे पक्ष हे कायम जनसंपर्क, जनाधार यावरच वाटचाल करीत असतात व त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी, लढण्यासाठी कोणत्याही ‘पोस्टर बॉय’ची गरज नसते,' असा टोला  उद्धव ठाकरे यांनी भाजपला हाणला आहे. शिवसेना आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. त्यामुळे शाह-ठाकरे यांच्या आजच्या भेटीतून काय निष्पन्न होणार याकडे लक्ष लागलेय.

 शिवसेनेचे ‘स्व’बळ दाखवून दिले 

भारतीय जनता पक्षाने एक व्यापक संपर्क मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी हे जगभ्रमणावर तर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे देशभ्रमणावर आहेत. एनडीएतील घटक पक्षांना शाह भेटणार आहेत म्हणजे नक्की काय करणार आहेत? व ते नेमके आताच म्हणजे पोटनिवडणुकांत भाजपची धूळधाण उडाल्यावरच का भेटत आहेत, हासुद्धा प्रश्नच आहे. २०१९च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणारच आहे. पालघर पोटनिवडणुकीतील निकालाने शिवसेनेचे ‘स्व’बळ दाखवून दिले आहेच. शिवसेनेसारखे पक्ष हे कायम जनसंपर्क, जनाधार यावरच वाटचाल करीत असतात व त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी, लढण्यासाठी कोणत्याही ‘पोस्टर बॉय’ची गरज नसते. गरजेनुसार पोस्टरवरची चित्रे बदलायची व मते मागायची हे धंदे आम्ही केले नाहीत, असा पलटवार शिवसेनेने भाजपवर केलाय.

नायडू यांनी भाजपशी संपर्क तोडला 

निवडणुकीसाठी वनगा यांना पोस्टवर आणले आणि मोदी व शाह यांना खाली उतरविले. मात्र, निवडणूक जिंकल्यानंतर पोस्टरवरून वनगा गेले व पुन्हा मोदी, शहा आले. त्यामुळे कधी कुणाशी संपर्क ठेवायचा व तोडायचा याची ‘व्यापारी गणिते’ ठरलेली असतात. आंध्रातील चंद्राबाबू नायडू यांनी भाजपशी संपर्क तोडला आहे. त्यामुळे शाह यांच्या संपर्क अभियानात नायडू भेटीचाही समावेश आहे काय? , असा सवालही उपस्थित केलाय.

बिहारात संपर्क घोटाळा

बिहारात जागावाटपावरून जदयु आणि भाजपचे वाजले आहे. बिहारातील निवडणुका मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढायच्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यावरून दोघांत खणाखणी सुरू झाली आहे. नितीश कुमार यांचा चेहरा आगामी निवडणुकीत चालणार नाही. त्यामुळे मोदीच पोस्टरवर हवेत हा भाजपचा आग्रह जेडीयूवाले मानायला तयार नाहीत. त्यामुळे बिहारात संपर्क घोटाळा सुरू झाला आहे. अर्थात भाजपबरोबर जाणे म्हणजे स्वतःच्या स्वतंत्र जनाधाराचा स्वतःहून गळा घोटण्यासारखे आहे, असेही 'सामना' अग्रलेखात म्हटलेय.