Andheri By-election : ऋतुजा लटके राजीनामा प्रकरण; ठाकरे गटाने ठोठावले न्यायालयाचे दरवाजे

 Andheri Vidhan Sabha By-election : अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. पालिकेने ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा मंजूर न केल्याप्रकरणी ठाकरे गटाने आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत

Updated: Oct 13, 2022, 08:01 AM IST
 Andheri By-election : ऋतुजा लटके राजीनामा प्रकरण; ठाकरे गटाने ठोठावले न्यायालयाचे दरवाजे  title=

मुंबई : Andheri Vidhan Sabha By-election 2022 : अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. मुंबई महानगरपालिकेने ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा मंजूर न केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्ष अर्थात ठाकरे गटाने आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आज 11 वाजता या प्रकरणी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर काल यासंदर्भात सुनावणी झाली. ऋतुजा लटके यांची बाजू वकील विश्वजित सावंत यांनी मांडली. आता याप्रकरणी आज निर्णय होण्याची शक्यता आहे. 

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा एक दिवस शिल्लक असताना ठाकरे गटाच्या म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना अर्ज दाखल करण्यात अडचण निर्माण झाली आहे. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या पालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण तो महापालिका प्रशासनाकडून मंजूर झालेला नाही. यामुळे ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे. आयुक्तांच्या भेटीनंतरही अजूनही त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही. कालही राजीनाम्यावर उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी धाव घेण्यात आली आहे.

 ऋतुजा लटके यांचा काय निर्णय?

ऋतुजा लटके यांना शिंदे गटात खेचण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा होती. यावर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यात ऋतुजा लटके यांनी आपण ठाकरे यांचेच निष्ठावंत शिवसैनिक असून आपल्यावर कोणताही दबाव नाही, असे म्हटले. तसेच अंधेरीची पोटनिवडणूक 'मशाल' चिन्हावरच लढणार असल्याचंही ऋतुजा यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचाबाबत होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दिल्ली उच्च न्यायलायत आज सुनावणी

दरम्यान, दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) या पक्षाच्यावतीने केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. शिवसेना (Shiv Sena) नाव आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्हं गोठवण्याविरोधात दिल्लीन्यायालयात याचिका सादर केली आहे. या याचिकेवर शिंदे गटही उत्तर देण्याच्या तयारीत आहे. काल या याचिकेवर सुनावणीची शक्यता होती. पण कालच्या कामकाजात या याचिकेचा उल्लेख नसल्याने काल सुनावणी झाली नाही. आज या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.