मुंबई : हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही, आमचा आत्मा हिंदुत्वाचा आहे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावलाय. राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रव्यवहारातून दोघांमधील संबध पुन्हा ताणताना दिसत आहेत. या पार्श्वभुमीवर राऊत बोलत होते. राज्यपालांनी लिहिेलेल्या पत्रात अनलॉकमध्ये मंदिर उघडण्याचा मुद्दा काढत शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला. याला मुख्यमंत्र्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. आता शिवसेना नेत्यांनी या पत्रावरुन राज्यपालांवर निशाणा साधलाय.
राज्यपालांनी हे राज्य घटनेनुसार चालते की नाही ते पहायचे, बाकीच्या इतर गोष्टी लोकनियुक्त सरकार पाहत असते असे टोला राऊतांनी लगावला. अनलॉक काढतानाचे निकष सरकार ठरवते असेही ते म्हणाले.
'आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचं हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही'.
धर्मनिरपेक्षता स्वीकारली का, अशा रोखानं सूर आळवणाऱ्या राज्यपालांना केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ज्या घटनेनुसार राज्यपाल पदाची शपथ घेतली त्या घटनेचा गाभा असणारी धर्मनिरपेक्षता मान्य नाही का, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांच्या पत्राचं उत्तर दिलं.
जनतेच्या भावना आणि श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणं हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणं चुकीचं तसंच तो एकदम उठवणंही अयोग्यच, ही बाब मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली. इतकंच नव्हे तर, राज्यपालांच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करत सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल अशी हमी त्यांनी दिली.