मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना खासदार विनायक राऊत आणि संजय राऊत यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी आज सकाळपासून मुंबईत राजकीय हालचालींनी वेग पकडला आहे. भाजपची नव्याने चर्चा करण्याची ऑफर धुडकावल्यानंतर संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी सत्तास्थापनेविषयी बोलण्यास नकार दिला.
यानंतर संजय राऊत थेट मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे मातोश्रीवरच्या बैठकीत ते शरद पवार यांचा संदेश उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु, जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिल्याची भूमिकाही पवारांनी घेतली आहे. त्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसेने साथ न दिल्यास भाजपचा प्रस्ताव स्वीकारून सत्तेत सहभागी व्हायचे का, याविषयीही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते.
राष्ट्रवादीची भूमिका बदलली, शिवसेनेची पंचाईत
दरम्यान, शिवसेनेने भाजपला चार प्रस्ताव दिल्याचीही चर्चा आहे. त्यानुसार शिवसेनेला सुरुवातीला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळावे. अथवा गृह, अर्थ, महसूल, उर्जा, बांधकाम आणि नगरविकास यापैकी तीन मंत्रिपदे शिवसेनेला मिळावीत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तर भाजपकडून शिवसेनेला यापूर्वीच उपमुख्यमंत्रीपदासह १५ मंत्रिपदे देण्याचा प्रस्ताव मांडला होता.