मुंबई : मातोश्रीवरील वडे खिचडीमुळे युतीत दिलजमाई झाल्याची जाहीर कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अभिनेता रितेश देशमुख यांने मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी युती होण्यामागचे गुपित उलगडले. तर दुसरीकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. जर कोणी सोबत येणार नाहीत त्यांना शिंगावर घेऊ. शिवसेना-भाजपमधील नाराजांना उद्धव ठाकरे यांनी थेट इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसेना - भाजप युती झाली आहे. आता पुढे काय होते याकडे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्यामुळे काहींनी थेट नाराजी व्यक्त करत काम करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांना उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे.
युतीत दिलजमाई कशी झाली याचे गुपित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलगडले आहे. मुंबईत लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इ इयर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता रितेश देशमुख याने मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी युतीच्या दिलजमाईचे गुपित मुख्यमंत्र्यांनी सांगितले. युतीचे सरकार पुन्हा एकदा येणारच, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपद याबाबत योग्यवेळी उत्तर मिळतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगत याबाबत गुप्तता पाळली.
आम्ही मातोश्रीमध्ये गेल्यानंतर सौ. रश्मी वहिनी यांनी जी साबूदाणा खिचडी आणि वडा खाऊ घातला. जे पदार्थ त्यांनी खाऊ घातले त्यानंतर बोलायला काही जागाच उरली नव्हती तेव्हाच दिलजमाई झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर कार्यक्रमात उपस्थित उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंसह सर्वांमध्ये जोरदार हशा पिकला.
मराठी व्यक्ती देशाची पंतप्रधान व्हावी, अशी आपली इच्छा आहे का? आणि यापैकी कोण पंतप्रधान झालेले तुम्हाला आवडेल, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमात नितीन गडकरी किंवा शरद पवार यांच्यापैकी कोण मराठी पंतप्रधान होईल, असे मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले, त्यावर 2019 आणि 2024 वर्ष तर आधीच बूक झाले आहे, पण मराठी पंतप्रधानाबाबत 2025 मध्ये चर्चा करु असं हजरजबाबी उत्तर फडणवीसांनी दिले.