चौकशीच्या तलवारी केवळ टांगत्या ठेवून भ्रष्टाचार कसा संपवणार; शिवसेनेचा मोदींना सवाल

भुजबळांच्या बाजूची कोठडी महाराष्ट्र सरकारने भरली नाही

Updated: Apr 5, 2019, 08:13 AM IST
चौकशीच्या तलवारी केवळ टांगत्या ठेवून भ्रष्टाचार कसा संपवणार; शिवसेनेचा मोदींना सवाल title=

मुंबई: विरोधी पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना तुरुंगात धाडण्याची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. मात्र, प्रत्यक्षात पुढे जाऊन फार काही घडत नाही, अशी नाराजी शिवसेनेने व्यक्त केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच भंडारा-गोंदिया मतदारसंघातील प्रचारसभेदरम्यान केलेल्या वक्तव्यासंदर्भात भाष्य केले आहे. या सभेत मोदींनी म्हटले होते की, आजकाल राष्ट्रवादीच्या नेत्यांना रात्रीची झोप येत नाही. त्यांना आपली झोप तिहार जेलमध्ये जमा झाल्याचा भास होत आहे. तिहार तुरुंगातील कोणीतरी आपले तोंड उघडेल आणि मग आपणही तिहार जेलमध्ये जाऊ ही भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेडसावत असल्याचे मोदी यांनी म्हटले होते. 

याच वक्तव्याचा दाखला देत शिवसेनेने केवळ चौकशीच्या तलवारी टांगत्या ठेवून भ्रष्टाचार संपणार कसा, असा सवाल उपस्थित केलाय. मोदी यांनी भंडाऱ्यात येऊन एक कोडे टाकले व हसत हसत निघून गेले. पंतप्रधानांनी असे कोड्यात बोलायला नको होते व जे आहे ते स्पष्ट सांगून संभ्रम दूर करायला हवा होता. २०१४ साली महाराष्ट्रातही चंद्रकांत पाटील यांनीही सांगितले की, अजित पवारांची चौकशी पूर्ण झाली असून लवकरच तेही तुरुंगात जातील. मात्र, भुजबळांच्या बाजूची कोठडी महाराष्ट्र सरकारने भरली नाही व तिहारमधील ‘पोपट’ कधी बोलेल ते कोणीच सांगू शकत नाही. पण पोपटाने दिलेल्या माहितीवरच मोदी यांनी भंडारा-गोंदियात फटाके फोडले. यामुळे अनेकांच्या कुंडल्या भीतीने फडफडल्या असतील, पण नुसत्याच लटकवत ठेवलेल्या तलवारी भ्रष्टाचार कसा संपवणार? त्याऐवजी मोदींनी दिल्लीतून जाहीरपणे ही तलवार फिरवली असती तर अनेक भ्रष्टाचाऱ्यांची गर्दन उडाली असती, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.