शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, पंतप्रधानांच्या भेटीआधी दोघांमध्ये बैठक

राज्यातील सद्य राजकीय विषयांवरही चर्चा होऊ शकते. 

Updated: Jun 7, 2021, 04:58 PM IST
शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, पंतप्रधानांच्या भेटीआधी दोघांमध्ये बैठक title=

दीपक भातुसे, मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे. मराठा आरक्षण प्रकरणी उद्या राज्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्याबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

याशिवाय ओबीसी आरक्षण प्रकरणीही मुख्यमंत्री आणि पवार यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील सद्य राजकीय विषयांवरही चर्चा होऊ शकते. यात महामंडळ नियुक्त्या, विधानसभा अध्यक्ष निवडणूक हे विषय असण्याची शक्यता आहे.

आरक्षणाचा मुद्दा सरकारसाठी महत्त्वाचा आहे. कारण येत्या १६ जूनपासून छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांच्या या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी ही पाठिंबा दिली आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत. सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

मराठा आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारने लक्ष घालावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी यासाठी ही भेट असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  अशोक चव्हाण हे देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.