कृष्णात पाटील, मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवाने राज्यात काँग्रेस अद्याप सावरलेली नसली तरी मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मात्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार भाकरी फिरवण्याच्या विचारात असून विधानसभेसाठी नव्या, ताज्या दमाच्या रक्ताला संधी देण्याच्या भूमिकेत आहेत. पवार यांच्या या भूमिकेचे पक्षातूनही स्वागत होत असून यामुळे आश्वासक काही घडेल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे आता पवार काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव स्विकारावा लागल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम राहत काहीसे अज्ञातवासात गेले होते. परंतु गुरूवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची चर्चा सुरू झाली. शरद पवार यांनी मात्र ही केवळ अफवा असून विलीनकरणाची थोडीही शक्यता नसल्याचे सांगितले.
शुक्रवारी मुंबईत दाखल झालेल्या शरद पवार यांनी पत्रकारांशी अनौपचारीक चर्चेत काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठीच्या मार्गदर्शनासाठी राहूल गांधी आल्याचे सांगितले. तसंच यावेळच्या चर्चेतून राज्यात ते भाकरी फिरवण्याच्या विचारात असल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्या युवा नेतृत्वाला संधी दिली पाहिजे अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. परंतु निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या संघटनात्मक रचनेत तात्काळ बदल होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केवळ विधानसभेसाठी नवे चेहरे देवून प्रयोग करण्याच्या विचारात ते आहेत. पक्षातील साचलेपण दूर करण्याचा प्रयत्न यानिमित्तानं ते करणारेत. शरद पवारांच्या या भूमिकेचे पक्षातूनही स्वागत होत असून यामुळे आश्वासक काही घडेल असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे. ताज्या दमाचे नवे चेहरे केवळ पार्थ आणि रोहित पवार यांच्यापर्यंतच मर्यादित राहता कामा नये. तसंच नेत्यांच्या मुलांनाच पुन्हा उमेदवारी देवून नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला भाकरी परतली असे म्हणता नाही येणार.
काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला बरं यश या निवडणुकीत मिळालं असलं तरी राज्यात शिवसेना-भाजप युतीला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठोस काही करण्याच्या दृष्टीने कामाला लागली आहे. यासाठी शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत असून यामध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि विधानसभा निवडणुकीसाठीची रणनिती निश्चित केली जाणार आहे.