मुंबई : मुंबईतल्या ईडी कार्यालय भेटीच्या नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवार हे पुण्याला रवाना झाला आहेत. पुण्यातल्या पुरग्रस्त भागाची शरद पवार पाहणी करणार आहेत. पुण्यात बुधवारी झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. मृतांचा आकडा १७ वर पोहोचला आहे, तर अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत. पुण्यातल्या पावसामुळे जनावरंही दगावली आहेत. तसंच गाड्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर शरद पवारांनी थेट ईडीच्या कार्यालयात जायचा निर्णय घेतला. शरद पवारांच्या या निर्णयाचे पडसाद राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उमटले.
ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी येऊ नये आणि शांतता राखावी असं आवाहन पवारांनी कार्यकर्त्यांना केलं होतं, पण तरीही कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर आणि राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाले. पण मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे आणि त्याआधी सहपोलीस आयुक्त विनय चौबे यांनी स्वत: पवारांची भेट घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ईडी कार्यालयात न जाण्याची विनंती केली.
पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर शरद पवार यांनी ईडी कार्यालयात न जायचा निर्णय घेतला. ' पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त मला भेटून गेले आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ईडी कार्यालयात जाऊ नका अशी विनंती त्यांनी केली. मी गृहखातं सांभाळलं आहे माझ्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सामान्यांना त्रास होऊ नये, म्हणून मी ईडी कार्यालयात जायचा निर्णय तहकूब केला आहे' असंही पवारांनी स्पष्ट केलं.
दुपारी २ वाजता शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार होते. पण पवारांनी यायची आवश्यकता नाही, असं ईडीनं पवारांना ईमेलच्या माध्यमातून कळवलं होतं. तसंच जेव्हा यायचं असेल तर कळवणार असल्याचंही ईडीनं म्हटल्याचंही पवारांनी सांगितलं.
मी बँकेचा सभासदही नव्हतो. परंतु, केवळ राजकीय हेतूनं विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. असं असलं तरी आपण ईडीच्या चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार, असं शरद पवारांनी म्हटलंय.