"चुकीला माफी नाही" म्हणत संजय राऊतांकडून विरोधकांना इशारा

काही बाटगे आपली निष्ठा दाखवण्यासाठी अशी विधानं करत असल्याचं देखील राऊतांनी म्हटलं आहे.

Updated: Aug 2, 2021, 02:36 PM IST
"चुकीला माफी नाही" म्हणत संजय राऊतांकडून विरोधकांना इशारा title=

मुंबई : प्रसाद लाड यांनी त्यांच्या एका भाषणात शिवसेना भवन तोडण्याचे वक्तव्य केलं आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरु असताना. शिवसेनेच्या अनेक कार्यकरत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर प्रसाद लाड यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आधी यावर भाष्य करणे टाळले होते, त्यांच्यामते या व्यक्तीच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. ते सगळं आमचे कार्यकर्ते पाहतील. परंतु त्यानंतर आज संजय राऊन यांनी त्यांचे मौन तोडले आणि प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

खरेतर जेव्हा प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन तोडण्याचे वक्तव्य केलं अशी चर्चा सुरु असताना, प्रसाद लाड यांनी त्यांचे यावर वक्तव्य केलं की, "माझं भाषणामध्ये असं म्हणणं होतं, की आम्ही माहिमला येतो तेव्हा इतका पोलीस बंदोबस्त ठेवला जातो की, जणू आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत, पण या वक्तव्याचा विपर्यात करण्यात आला आहे."

त्यानंतर संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधत आपलं वक्तव्य दिलं

संजय राऊत काय म्हणाले?

"ज्यांनी ज्यांनी शिवसेना भवनावर हल्ले करायचा प्रयत्न केला ते राजकारणातून आणि सार्वजनीक जीवनातून नंतर गायब झाले, हा आजवरचा इतिहास आहे." शिवसेना भवन तोडण्याची भाषा केल्यामुळे संजय राऊतांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली.

काही बाटगे आपली निष्ठा दाखवण्यासाठी अशी विधानं करत असल्याचं देखील राऊतांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी भाजपालाही इशारा दिला आहे की, "सत्त नसल्यामुळे काही बाटग्यांना झटके येतात, म्हणून पक्ष सोडून काही लोकं दुसऱ्या पक्षात जातात आणि मग त्यांचा भ्रमनिरास होतो. त्यांच्या खांद्यावर जर बंदूक ठेऊन जर काही लोकं असे उद्योग करत असतील, तर भाजपासारख्या एका जुण्या पक्षाला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल" तसेच त्यांनी "चुकीला माफी नाही" असंही सूचक विधान त्यांनी केलं आहे.

प्रसाद लाड यांच्या कोणत्या वक्तव्याची चर्चा होत आहे?

प्रसाद लाड यांनी त्यांच्या एका भाषणात वक्तव्य केलं की, "भाजपची ताकद काय आहे हे 2014 विधानसभा निवडणुकीत आपण दाखवलंय. कारण, त्यावेळी भाजप होती. भाजपला मानणारा कार्यकर्ता विचाराचा मतदार होता. त्यात आता सोने पे सुहागा हुआ है. नारायण राणे साहेबांना आणि राणे कुटुंबाला मानणारा स्वाभिमानचा एक मोठा गट राणेंच्या निमित्ताने भाजपात आला आहे. यामुळे भाजपची ताकद ही निश्चित दुप्पट झाली आहे."

पुढे ते म्हणाले, "नितेशजी पुढच्या वेळेस आपण कार्यकर्ते हे थोडे कमीच आणू. कारण, आपण आलो की, पोलिसही खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका, म्हणजे हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. त्यांचं कारण एवढी भीती आमची त्यांना वाटतं की, हे माहिममध्ये आले म्हणजे शिवसेना भवन फोडणारच. काही घाबरु नका, वेळ आली तर ते देखील करु."

त्यावर प्रसाद लाड यांचं स्पष्टीकरण

जेव्हा यासगळ्या बातम्या प्रसाद लाड यांच्या विरोधात उठल्या होत्या तेव्हाच प्रसाद लाड यांनी त्यावर आपले स्पटीकरण दिले होते, तेव्हा त्यांनी सांगितले की, "घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा तेव्हा कारे ला आरे चं उत्तर दिलं जाईल. पण ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो, कोणत्याही पक्षाचे नसलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो, त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनबद्दल असं चुकीचं वक्तव्य माझ्याकडून कधीही केलं जाणार नाही."

माझं भाषणामध्ये असं म्हणणं होतं, की आम्ही माहिमला येतो तेव्हा इतका पोलीस बंदोबस्त ठेवला जातो की, जणू आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत, असं म्हटलं होतं. पण या वक्तव्याचा विपर्यात करण्यात आला. 

कोणत्याही प्रकारे शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना प्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता. त्यामुळे जर मी कोणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिलं आहे.