राज्यातील मंदिरे, जीम कधी सुरु होणार; संजय राऊत म्हणाले...

१ सप्टेंबरपासून अनलॉक ४ हा टप्पा सुरु होईल. 

Updated: Aug 27, 2020, 02:10 PM IST
राज्यातील मंदिरे, जीम कधी सुरु होणार; संजय राऊत म्हणाले... title=

मुंबई: राज्यातील मंदिरे आणि जीम सुरू करण्याबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो, असे संजय राऊत यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लॉकडाउनमुळे जीम आणि मंदिरे गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहेत. ती पुन्हा सुरु करावीत अशी मागणी वारंवार केली जात आहे. या मुद्द्यावरून भाजपने अत्यंत आक्रमकपणे भूमिका लावून धरली आहे. 

काँग्रेसमध्ये राहुल गांधींचेच नेतृत्त्व सर्वव्यापी ठरू शकेल- संजय राऊत

यापूर्वी १५ ऑगस्टला जीम आणि मंदिरे सुरु होणार असे सांगितले गेले होते. मात्र, आता सप्टेंबर महिना उजाडायला आला तरी सरकारने यासंदर्भात कोणतेही भाष्य केलेले नाही. १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ हा टप्पा सुरु होईल. तेव्हाच जीम आणि मंदिरासंदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता आहे. उद्धव ठाकरे यांनी आता बिगरभाजपशासित राज्यांचे नेतृत्त्व करायला पाहिजे. उद्धव ठाकरे कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येवून लढायला हवे, हीच भूमिका त्यांनी बुधवारी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत मांडली. 

राम कदम सिद्धिविनायक मंदिरात जाणार
महाराष्ट्र सरकार दारुची दुकाने उघडायला परवानगी देते पण मंदिरे उघडायला सरकार अजूनही तयार नाही. वारंवार मागणी करूनही सरकार ऐकायला तयार नाही. त्यामुळे येत्या शनिवारी मी सिद्धिविनायक मंदिरात जाणार आहे. महाराष्ट्र सरकार परमेश्वराला घाबरत असेल तर आम्हाला अडवण्याची हिंमत करणार नाही.