दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार - संजय राऊत

ऑनलाईन दसरा मेळाव्याच्या चर्चेला पूर्णविराम

Updated: Oct 17, 2020, 03:03 PM IST
दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार - संजय राऊत  title=

 

मुंबई : दसरा मेळावा व्यासपिठावरच होणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच दसरा मेळावा असेल. दसरा मेळाव्याचं महत्व राजकिय आणि सांस्कृतिक देखील आहे. दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत चर्चा होईल. नियम आणि आरोग्याच्या दृष्टीनं योग्य होईल अश्या पद्धतीचं नियोजन केलं जाईल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. 

कोरोनामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याच्या जोरदार चर्चा असून या चर्चांना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. कुणी सांगितलं शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल? उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचं भाषण हे व्यासपीठावरूनच होईल. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, असं सांगत संजय राऊत यांनी शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

येत्या २५ ऑक्टोबरला दसरा आहे. हा दसरा मेळावा ऑनलाईन न होता व्यासपीठावरच होणार असल्याचं म्हटलं आहे.  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या गोष्टी ऑनलाइन होत आहेत. पण मी आजच वाचलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये 12 सभा घेणार आहेत. त्या कशाप्रकारे सभा घेतात त्याचा आम्ही अभ्यास करू…नियम वैगरे आहेतच. शेवटी या राज्यात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत. सरकारने काही नियम केले आहेत. कोणत्याही नियमांचं उल्लंघन होणार नाही, असं सांगतानाच दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. येत्या एक-दोन दिवसात त्यावर निर्णय होईल.

मला वाटतं यंदाचा दसरा मेळावाही व्यासपीठावरच होईल. काही मार्ग काढता येईल. चर्चा सुरू आहे. यंदा प्रथमच ठाकरे मुख्यमंत्री आहेत. बऱ्याच वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं राऊत म्हणाले.