'जिभेला लगाम घाला'; संभाजीराजेंच्या 'त्या' ट्विटला संजय राऊतांचा रिप्लाय

उद्धवजी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला.

Updated: Jan 12, 2020, 10:53 PM IST
'जिभेला लगाम घाला'; संभाजीराजेंच्या 'त्या' ट्विटला संजय राऊतांचा रिप्लाय title=

मुंबई: शिवरायांची मोदींशी तुलना केलेली पटते का, असा सवाल छत्रपतींच्या वंशजांना विचारणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा रोष ओढवून घेतला होता. छत्रपती संभाजीराजे यांनी अगदी एकेरी उल्लेख करत संजय राऊत यांना करड्या शब्दात समज दिली होती. उद्धवजी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येकवेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमावेळी सिंदखेडराजामध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते.

'उद्धवजी राऊतांच्या जिभेला लगाम घाला, मुजोरी खपवून घेणार नाही'

या सगळ्या प्रकारानंतर राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या ट्विटर रिप्लाय दिला आहे. यामध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की, मा.छत्रपती संभाजी राजे आम्ही आपला नेहमीच आदर करतो. संजय राऊत यांनी असे कोणते विधान केले, ज्यामुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाला? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानेच चालत आहे. सदैव चालत राहील. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राऊत आणि संभाजीराजे यांच्यातील हे ट्विटरवॉर इथेच संपणार की ही लढाई आणखी रंगणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

संजय राऊत आणि संभाजीराजे यांच्यातील वादासाठी भाजप नेते जय भगवान गोयल यांचे नुकतेच प्रकाशित झालेले 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' हे पुस्तक कारणीभूत ठरले. मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही, असे सांगत या पुस्तकाच्या शीर्षकावर अनेक शिवप्रेमींना आक्षेप घेतला होता. 

'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी'; भाजप नेत्याच्या पुस्तकावरून शिवप्रेमी संतप्त

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी थेट छत्रपतींच्या वंशजांना डिवचले होते. मोदींची थेट छत्रपती शिवरायांशी तुलना करणे सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का, असा सवाल राऊतांनी विचारला होता.