"मी कुठे म्हटलं..."; मविआचा मोर्चा एवढा मोठा नव्हताच म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

‘मविआ’चा मोर्चा एवढा मोठा नव्हताच. त्यामुळे राऊतांना दुसऱ्या मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करावा लागला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

Updated: Dec 19, 2022, 12:07 PM IST
"मी कुठे म्हटलं...";  मविआचा मोर्चा एवढा मोठा नव्हताच म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर  title=
(फोटो सौजन्य - PTI)

Sanjay Raut : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न, भाजप नेत्यांकडून महापुरुषांबाबत सातत्याने होत असलेली वादग्रस्त वक्तव्ये यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी शनिवारी महाविकास आघाडीतर्फे (MVA) महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात आला होता. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. या मोर्चावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी याला नॅनो मोर्चा असे म्हटले होते. 

त्याला प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी टीका केली होती.  "संजय राऊतांनी ट्वीट केलेला व्हिडीओ मराठा मोर्चातील आहे, अशी माहिती मला मिळाली आहे. याची मी नक्की पडताळणी करेन. हा व्हिडीओ मराठा मोर्चातील असू शकतो. कारण ‘मविआ’चा मोर्चा एवढा मोठा नव्हताच. त्यामुळे राऊतांना दुसऱ्या मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करावा लागला," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

"मी कुठे म्हटलं की तो महाविकास आघाडीचा मोर्चा आहे? मी त्यात कुठेही दावा केलेला नाही की तो महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. मराठा मोर्चाला सुद्धा हे लोक नॅनो मोर्चा म्हणत होते. दोन्ही मोर्चे ताकदीचे होते. मराठा मोर्चामध्ये जे सामील होते ते सुद्धा महाविकास आघाडीच्या मोर्चात सामील होते. त्यामध्ये भाजपला इतकं कळवळून टीका करण्याचे कारण नाही. अशा मोर्चांना नॅनो मोर्चे म्हणायचे ही भाजपची परंपरा आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चांने दिल्लीला ताकद दाखवली," असे संजय राऊत म्हणाले.

"छत्रपती संभाजीराजे हे प्रगल्भ नेते आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाविषयी बोलत आहे. हे भाजपच्या नादाला कुठे लागलेत. सर्व मोर्चे आपलेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविषयी आपण बोलत आहोत त्यामुळे त्याविषयी आपण बोलायला हवं इतकंच मी छत्रपतींनी आवाहन करतो," असेही राऊत म्हणाले.