अमित शाह यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला पवारांच्या नातवाचं प्रत्युत्तर

रोहित पवार यांची अमित शहांवर टीका

Updated: Sep 3, 2019, 05:02 PM IST
अमित शाह यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला पवारांच्या नातवाचं प्रत्युत्तर  title=

दीपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : अमित शाह यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला पवारांच्या नातवानं प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट टाकून भाजपला डबल ढोलकीची उपमा दिली आहे.

शरद पवारांनी काय केलं ?

अमित शाह यांनी विचारलेला हा प्रश्न रोहित पवारांना आवडला नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तापलेल्या राजकारणात पवारांचे नातू रोहित पवारांनी उडी घेतली. आणि भाजपा नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे.

गरज पडली तर साहेबांचा सल्ला

गरज पडली तर बारामतीत येऊन साहेबांचं कौतुक करायचं आणि निवडणूक आली की त्यांनी विचारायचं साहेबांनी काय केलं?. असा डबल ढोल असतो. दोन्ही बाजूने वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोलासारखं वाजत असतं. पण आता बास झालं. अशी पोस्ट रोहित पवारांनी फेसबुकवर टाकली आहे. त्यावर भाजप कधीही सूडाचे राजकारण करत नाही, असं भाजपनं म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांत बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पवारांवर टीका होते आहे. रोहित पवार यंदाच्या निवडणुकीतून राजकीय आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. पवार एकाकी असताना अशा वेळी भाजपावर टीका करुन रोहित पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.