वानखेडे स्टेडिअमच्या १२० कोटींच्या करमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई महानगरपालिका आणि अन्य संबंधित यंत्रणांची देणीही वानखेडे स्टेडियम प्रशासनाला फेडायची आहेत.

Updated: Jan 28, 2020, 11:02 AM IST
वानखेडे स्टेडिअमच्या १२० कोटींच्या करमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे title=

मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (MCA) राज्य सरकारची १२० कोटी रुपयांची थकबाकी असून ती माफ अथवा कमी करुन घेण्यासाठी असोसिएशनची धावपळ सुरू आहे. काल यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे साकडे घातले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनमार्फत वानखेडे स्टेडियम चालवले जाते. या स्टेडियमचा २०१२ पासूनचा १२० कोटी रुपयांचा अकृषिक कर थकला आहे. त्याच्या वसुलीसाठी राज्य सरकारने एमसीएला नोटीस पाठवली होती. ही नोटीस मिळाल्यानंतर हा कर कमी करुन घेण्यासाठी एमसीएचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

'मनसेचा महाविराट मोर्चा पाहिल्यानंतर सरकार घाबरेल, पुन्हा 'तशी' हिंमत करणार नाही'

याशिवाय, मुंबई महानगरपालिका आणि अन्य संबंधित यंत्रणांची देणीही वानखेडे स्टेडियम प्रशासनाला फेडायची आहेत. गेल्या पाच वर्षांत या कराचा आकडा तब्बल २०० कोटींपर्यंत जाऊन पोहोचला आहे. यामध्ये पालिकेच्या ७३ कोटीच्या मालमत्ता कराचाही समावेश आहे. वानखेडे स्टेडियम प्रशासनाने गेल्या पाच वर्षांपासून हा कर थकवल्याचे समजते. याशिवाय, आंतरराष्ट्रीय सामने आणि आयपीएल स्पर्धेवेळी पोलीस बंदोबस्ताचे प्रत्येक रात्रीसाठी ५० लाख रुपये या हिेशेबाने पाच वर्षांचे पैसेही थकले आहेत. 

महाविकासआघाडी हा मल्टिस्टारर नव्हे तर हॉरर सिनेमा- फडणवीस

त्यामुळे आता 'एमसीए'ने अकृषिक कराच्या थकबाकीत कपात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. आमच्याकडून अकृषिक नव्हे तर व्यावसायिक दराने आकारणी झाल्याचे 'एमसीए'चे म्हणणे आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी महसूल खाते, पालिका आणि 'एमएमआरडीए'शी चर्चा केल्याचेही समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि 'एमसीए'चे माजी अध्यक्ष शरद पवारही या बैठकांना उपस्थित असल्याचे कळते.