प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : जन्मतः किंवा अपघातानं दिव्यांगत्व आल्यावर अनेकजण निराश होतात. नैराश्येच्या गर्तेत गेलेल्या तरुणांसाठी विरारचा मोहनसिंह रोलमॉडेल आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर या मोहनसिंहनं अपंगत्वावर मात केली आहे. विरारमध्ये राहणारा हा आहे मोहनसिंह ठाकूर. मोहन एक हातानं दिव्यांग आहे. दुधाचा व्यवसाय़ करणाऱ्या मोहनसिंगनं दिव्यांगत्वावर मात केली आहे. मोहनसिंग एक हातानं दिव्यांग असतानाही गायींचं दूध काढतो.
हातपंप चालवून जनावरांना पाणी पाजतो. दूध टाकण्यासाठी स्वतः तो सायकलवर शहरात जातो. गोठ्याच्या आवारात असलेल्या नारळाच्या झाडांवर तो चढतो. नारळ काढतो. काढलेले नारळ तो सोलूनही देतो. विशेष म्हणजे दिव्यांग हाताचा वापरही तो कौशल्यानं करतो.
याहून मोठी गंमत म्हणजे तो बुलेटसारखी वजनी गाडीही चालवतो. विहिरीत पोहणारा त्याच्यासारखा तरुण परिसरात नाही. दिव्यांगत्वावर मात करून आज मोहनसिंह यशस्वी माणूस म्हणून जगतोय. दिव्यांगत्व आल्यावर अनेकजण खचून जातात.
काही जण तर हातपाय गाळून लोकांच्या मेहरबानीवर जगतात. पण मोहनसिंह मनानं खंबीर आहे. आज तो स्वतःच्या पायावर उभा तर आहेच. शिवाय यशस्वी व्यावसायिकही आहे. दिव्यांगत्वाला हरवणारा मोहनसिंह हाच खराखुरा बाहुबली आहे असं म्हणावं लागेल.