Maharashtra Politics : येत्या काही तासांत राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar ) हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राजकारणात सुरु असलेल्या चर्चे नंतर धनंजय मुंडे मुंबई कडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे तडका फडकी मुंबईला रवाना झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यातच धनंजय मुंडे यांचे दोन्ही नंबर बंद असल्याने या राजकीय घडामोडीचे गूढ आणखी वाढले आहे. अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी देखील अजित पवार यांच्याबाबत राजकीय भविष्यवाणी केली आहे (Maharashtra Politics).
'मोदी-शाहांनी हिरवा कंदील दाखवताच अजित पवार नॉट रिचेबल होतील असं वक्तव्य राणा यांनी केले. अजित पवार भाजपसोबत येणार असल्याचं सूतोवाच रवी राणा यांनी केले आहे. अद्याप अजित पवार यांनी आपली कोणतीही भूमिका मांडलेली नाही.
अजित पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ असून ते वेगळा विचार करतायत अशी जोरदार चर्चा रंगली आहे. अजित पवारांनी भाजपावर टीका करण्याचंही टाळलेलं आहे. तेव्हा शिवसेनेच्या धर्तीवर राष्ट्रवादीतही फूट पडणार का या प्रश्नावर अनेक राजकीय अंदाज बांधले जात आहेत. त्यातच पुढचा संपूर्ण महिना पक्षप्रवेशाचा असल्याचं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले आहे. तेव्हा चर्चा आणखीनच रंगू लागल्या आहेत. मात्र, अजित पवार वेगळा विचार करणार नाहीत असा दावा मविआच्या नेत्यांनी केला आहे.
अजित पवार कालच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत होते. मात्र, आज एका कार्यक्रमाला आले नाहीत म्हणून लगेच चर्चा करण्यात अर्थ नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय भूकंपाबाबत अजित पवार आणि भाजपाच सांगू शकेल असं भाई जगताप म्हणाले. तसेच भाजपा विरोधात काँग्रेस लढणार आणि जिंकणार सुद्धा असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
जनता महागाईने त्रस्त आहे. नद्या कोरड्या पडल्या आहेत, गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. या सगळ्या वरून लक्ष विचलीत करण्यासाठी राजकीय भूकंप येणार अशी चर्चा रंगवली जात आहे. राज्याचे विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. राजकीय भूकंप वगैरे बकवास आहे. जे काय करायचं हे यांचा आधीच ठरल आहे. पण, जनता आता कोणावरच विश्वास ठेवणार नाही असं राजू शेट्टी म्हणाले.