मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मद्यविक्रीची दुकानं सुरु करण्याबाबत वक्तव्य अनेक नेत्यांकडून त्याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. राज्यात लॉकडाऊन काळात दारु दुकानं सुरु करण्यास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. गावा गावातील म्हणते पारु,आता माझ्या नवऱ्याची सुटली आहे दारु, असं म्हणत त्यांनी लॉकडाऊन काळात मद्यपान, दारु दुकानं आणि बार सुरु करु नका, अशी मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विनंती करणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं.
दारुची दुकानं, मद्यपान हॉटेल सुरु करू नका, मद्यपींचं व्यसन सुटलं आहे. कोट्यवधी घरांमध्ये दारु दुकानं बंद असल्याने आनंद आहे. त्यामुळे आता दारु दुकानं सुरु करुन त्यांच्या आनंदावर विरजण घालू नका असं ते म्हणाले.
राज्य चालविण्यासाठी महसुलची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करून मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, मद्यविक्रीतून राज्याला मोठ्याप्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे मद्याची दुकाने सुरु झाल्यास राज्य सरकारच्या तिजोरीत काही पैसे जमा होतील. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून राज्यातील मद्याची दुकाने उघडायला परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
दरम्यान, राज्यात मद्याची दुकाने उघडायला परवानगी द्यावी, या मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेचा भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार संपेपर्यंत महाराष्ट्रातील देशी आणि विदेशी मद्याची दुकानं सुरु होऊ नयेत असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
मद्याची दुकानं सुरु झाली तर मद्य विकत घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होईल. परिणामी सोशल डिस्टन्सिंगचे नियम ढाब्यावर बसवले जाऊ शकतात. त्याशिवाय काही सामाजिक आणि कौटुंबिक समस्याही उद्भवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या घरात पैसे येणे बंद झालं आहे. अशावेळी मद्याची दुकाने उघडायला परवानगी दिल्यास मध्यमवर्गीय घरांमधील पैसा उधळला जाईल, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.