पुतळा कोसळून 8 दिवस झाले, जयदीप आपटे अजूनही फरार... आता पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Chatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवीज महाराजांचा पुतळा कोसळला आणि याचे पडसाद राज्यभर उमटले. पुतळा कोसळला त्या दिवसापासून पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे फरार आहे.   

राजीव कासले | Updated: Sep 3, 2024, 03:00 PM IST
पुतळा कोसळून 8 दिवस झाले, जयदीप आपटे अजूनही फरार... आता पोलिसांनी घेतला मोठा निर्णय title=

Chatrapati Shivaji Maharaj Statue : राजकोट पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे (Jaideep Apte) विरोधात पोलिसांनी लुक आऊट नोटीस (Look out Circular) जारी केलीये. जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी सात पथके तयार केली आहेत. त्यातील दोन पथके तांत्रिक विश्लेषणासाठी आणि पाच पथके मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोवा येथे तपासासाठी रवाना केली आहेत. जयदीप आपटे हा राजटोक किल्ल्यावरील (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा (Chatrapati Shivaji Maharaj Statue) शिल्पकार आहे.. पुतळा कोसळल्यानंतर तो फरार झालाय. सिंधुदुर्ग पोलीस त्याच्या मागावार असून अद्यापही त्याचा थांगपत्ता लागलेला नाहीये.

दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सहाय्यक अभियंता अजित जनकराज पाटील यांनी मालवण पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारी नुसार पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप केला होता. या तक्रारीवरुन मालवण पोलिस स्थानकात शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात मालवण गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच आपटे आणि पाटील दोघेही फरार झाले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत चेतन पाटीलला अटक केली आहे. पण जयदीप आपटे अद्याप फरार आहे. शिवरायाच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर जयदीप आपटे घराला टाळे लावून फरार झालाय.

भास्कर जाधव यांची टीका
शिल्पकार जयदीप आपटे, पटवर्धन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण याचे स्व्हिय सहाय्यक आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लिंक कशी असेल ते तुम्ही विचार करून बघा. त्यामुळे आपटेंना अटक फडणवीस कशी करणार. अटक जाणीवपूर्वक टाळली जात आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. 

सकल मराठा समाजाकडून निषेध
सकल मराठा समाजाने राजकोट किल्ल्यावरील घटनेचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा कमकुवत पुतळा तयार करून तो पडण्यास कारणीभूत ठरलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याची बोटं जो कोणी छाटून आणेल, त्याचा बदलापूरमध्ये जाहीर सत्कार करू, अशी घोषणा बदलापूरमधील सकल मराठा समाजाचे अविनाश देशमुख यांनी केली आहे. तसंच सकल मराठा कार्यकर्त्यांनी दोषींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलिसांना दिलेल्या पत्रात केली आहे.बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदनही दिलं.