दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकारणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे. राजस्थानमध्ये सत्ता बदलासाठी भाजपकडून सुरू असलेल्या प्रयत्नांच्या विरोधात राज्यात काँग्रेसतर्फे राजभवनासमोर आंदोलन केले जाणार आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या आंदोलनात राज्यातील काँग्रेसचे मंत्री आणि आमदार सहभागी होणार आहेत.
राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्याबरोबर गेलेल्या १८ आमदारांच्या निलंबनाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाच्या निकालाला वेळ लागणार आहे, त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी राजस्थानच्या राज्यपालांकडे केली आहे. मात्र राज्यपालांनी ही मागणी मान्य केलेली नाही. याविरोधात राजस्थानमध्ये राजभवनाच्या बाहेर काँग्रेसने आंदोलन करणार आहेत.
सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून भाजप विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. राजस्थानमध्ये भाजप लोकशाहीची हत्या करू पाहत आहे. याविरोधात काँग्रेस पक्ष आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून भाजप विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. राजस्थानमध्ये भाजप लोकशाहीची हत्या करू पाहत आहे. याविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या दि. २७ जुलै रोजी स. ११ वा. मुंबई येथे राजभावनासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) July 26, 2020
राज्यपाल भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी राज्यातही काँग्रेसचे आमदार आणि मंत्री राजभवनासमोर आंदोलन करणार आहेत.