मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कल्याण डोंबिवलीमध्ये जिल्हाधिका-यांच्या जमिनीवर विकास करताना अडचणी निर्माण होत असल्याच्या निमित्तानं ही भेट होती.
त्यामुळे वर्षानुवर्षं तिथे राहणा-या स्थानिकांचं पुनवर्सन करण्यात अडचण येत असल्याचा मुद्दा राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांशी तात्काळ दूरध्वनीवरुन चर्चा केली.
दरम्यान, मनसेनं पंधरवड्यापासून पुकारलेलं फेरीवाला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, या बैठकीत चर्चा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र फेरीवाल्यांसादर्भात यावेळी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार यापुढे रेल्वे, पोलीस आणि बीएमसीने फेरीवाल्यांवर कारवाई केली नाही, तर या तिन्ही यंत्रणांविरोधात न्यायालयाच्या अवमाननेची याचिका मनसे दाखल करेल असंही त्यांनी सांगितलं.