मुंबई : भाजप मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्या पुस्तिकेचे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच शिवसेनेनं या प्रकरणातून आपली जबाबदारी झटकण्यास सुरुवात केलीय.
स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिगत स्तरावर शिवसेनेची भाजपच्या बदनामीची खेळी गांभीर्यानं घेतल्यानं आणि त्याच ताकदीनं प्रत्त्युत्तर देण्याची तयारी सुरु झाल्यामुळे शिवसेनेचे धाबे दणाणले आहेत.
शिवसेनेचे नेते आणि आमदार व्यक्तिगत स्तरावर खाजगीत सांगत आहेत की त्या पुस्तिकेशी पक्षाचा काहीही संबंध नाही. फार-फार तर काल शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले असेल, पण ती शिवसेनेनं तयार केलेली पुस्तिका नाही... ती शिवसेनेची अधिकृत पुस्तिका नाही.
कुणा त्रयस्थ व्यक्तीने तयार केलेली पुस्तिका बैठकीत पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली असू शकते. शिवसेनेचे नेते आणि मंत्री हे सुद्धा या पुस्तिकेबाबत अनभिज्ञ असल्याचं समजतंय. त्यामुळे या पुस्तिकेच्या माध्यमातून पक्षालाच कुणी पक्षाला अडचणीत आणलं तर नाही ना, अशी चर्चाही शिवसेनेत सुरु झालीय.